Parbhani : विहिरी आटल्यामुळं पाण्यासाठी धावपळ; काही भागांत भीषण टंचाई, वीज पुरवठा खंडित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani Water Shortage

विद्युत पुठवठा खंडित होत असल्यामुळे शहराच्या काही भागात विलंबाने पाणी पुरवठा झाला आहे.

Parbhani : विहिरी आटल्यामुळं पाण्यासाठी धावपळ; काही भागांत भीषण टंचाई, वीज पुरवठा खंडित

परभणी : कधी खंडीत वीज पुरवठा (Power Supply) तर कधी लिकेजसमुळे गेल्या काही दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दुसरीकडे विंधन विहिरी आटल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे.

पुढील एक ते दीड महिन्यात संपूर्ण शहराला नियमित पाणीपुरवठा (Water Shortage) होणार असल्याची माहिती पालिका (Parbhani News) सूत्रांनी दिली. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून यूआयडीएसएमटी योजना व अमृत या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या आहे. शहरात लहान-मोठे १८-२० जलकुंभ असून, त्याद्वारे रोज ५२ एमएलडी पाणी सोडण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

पालिकेने दोन्ही योजना पूर्ण झाल्यानंतर शहराला रोज पाणी पुरवठा केला जाऊ शकतो, असा दावा पालिकेने केला होता. परंतु, त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. कुठे दोन ते तीन तर कुठे चार ते पाच दिवसाला तर कुठे आठ दिवसाला पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आहे.

कारेगाव परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रावरून ज्या जलकुंभांना पाणीपुरवठा केला जातो, त्या परिसरातील वसाहतींमध्ये विविध कारणांनी नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. सुरुवातीला तीन ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत असे परंतु गेल्या एक-दोन महिन्यापासून मात्र पाण्यासाठी आठ-आठ दिवस नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

विंधन विहिरी आटल्यामुळे ताण

गेल्या एक-दीड महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली. त्यामुळे शहराच्या विविध भागातील घराघरांमध्ये असलेल्या विंधन विहिरीचे एक तर पाणी कमी झाले आहे अथवा आटले आहे. एकीकडे विंधन विहिरी आटल्या तर दुसरीकडे नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शहरातील अनेक कुटुंबे पिण्यासाठी जारचे, बाटलीबंद पाण्याचा वापर करतात तर पालिकेच्या पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर केल्या जातो; तसेच अनेकांकडे आठ-आठ दिवसांचे पाणी साठवण क्षमतादेखील नसल्यामुळे अशांना विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

महावितरणही जबाबदार

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यास काही अंशी महामंडळही जबाबदार आहे. वीज रोहित्रांमध्ये होणारे वारंवार बिघाड, तुटणाऱ्या तारा व त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा विलंब याचादेखील पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे.

विद्युत पुठवठा खंडित होत असल्यामुळे शहराच्या काही भागात विलंबाने पाणी पुरवठा झाला आहे. परंतु, येत्या एक-दीड महिन्यात काही राहिलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. शहराला रोज ५२ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो.

-मिर्झा तनवीर बेग, पाणीपुरवठा अभियंता, महापालिका परभणी.