Sambhajinagar : लग्नात अंगाला धक्का लागला म्हणून भरमंडपात तिघांवर चाकूने सपासप वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

लग्न लागल्यानंतर तिथे वावरताना रात्री सुनीलचा धक्का शंकर याला लागला. त्यावरुन तो सुनीलला शिवीगाळ करु लागला.

Sambhajinagar : लग्नात अंगाला धक्का लागला म्हणून भरमंडपात तिघांवर चाकूने सपासप वार

छत्रपती संभाजीनगर : लग्नात (Wedding Ceremony) धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना पाहून तरुणाचे वडील वाचविण्यासाठी धावले असता वडिलांवरही चाकूने वार करण्यात आला.

त्याचवेळी तरुणाच्या मामाने ही घटना पाहिली असता ते सोडविण्यास आले असता त्यांच्यावरही चाकू हल्ला करण्यात आला. ही घटना १ जून रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान चौराहा परिसरात घडली. याप्रकरणी चाकूने वार करणाऱ्याविरोधात सिटी चौक पोलिस (City Chowk Police) ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर प्रकाश जाधव (२६, रा. निमगाव, ता. भोकरदन, जि. जालना, सध्या रा. वाघोली, ता. हवेली, जि.पुणे) असे त्या आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात सुनिल बळीराम मिमरोट (२७, रा. रोहिदासनगर, गल्ली क्र. एक,मुकूंदवाडी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार सुनील याच्या चुलत बहिणीचा कुंवर फल्ली, चौराहा भागात विवाह होता. त्यासाठी सुनीलसह त्याचे आईवडील, भाऊ असे आले होते. दरम्यान तिथे आरोपी शंकर हाही आलेला होता.

लग्न लागल्यानंतर तिथे वावरताना रात्री सुनीलचा धक्का शंकर याला लागला. त्यावरुन तो सुनीलला शिवीगाळ करु लागला. दरम्यान, त्याला समजावून सांगण्याच प्रयत्न केला असता, शंकर याने तेथील जेवणाच्या टेबलवर जाऊन चाकू घेऊन आला आणि सुनीलच्या हातावर चाकूने वार केला. त्याचवेळी सुनीलचे वडील बळीराम मिमरोट हे भांडण सोडविण्यासाठी आले आरोपीने त्यांच्या कानाजवळ चाकूने वार केला.

ही घटना पाहून फिर्यादीचे मामा अशोक दीपचंद जाधव हे धावले असता, त्यांच्याही हातावर चाकूने वार करुन आरोपी पळून गेला. सदर प्रकरणात शंकर जाधव यानेही फिर्याद दिली. त्यावरुन शंकर हा नातेवाईकाच्या लग्नासाठी आला असता सुनील याने लग्नादरम्यान बाजूला बोलाविले.

त्यावर शंकर मला बाजूला का बोलावले असे विचारताच सुनील याने तिथे पडलेल्या लोखंडी पाईपने मारल्याचे शंकरच्या फिर्यादीत म्हटले आहे. तसेच सुनी च्या आईवडील, भावानेही मारल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. यावरुन सुनीलसह त्याचे आईवडील, भाऊ या चौघांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपनिरीक्षक मुंढे करत आहेत.