Aurangabad : सराफाला लुटून पोलिसाने फेडले कर्ज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

Aurangabad : सराफाला लुटून पोलिसाने फेडले कर्ज!

औरंगाबाद : सोने व्यापाऱ्याला पोलिस अंमलदाराने भर रस्त्यात अडवून लूटमार करत २४ तोळे सोन्यांसह रोख साडेआठ लाख रुपये लांबविल्याची घटना १२ सप्टेंबररोजी रात्री दहा वाजता केंब्रिज चौक परिसरात घडली होती. विशेष म्‍हणजे, लुटलेल्या रोकडमधून पोलिसाने दोन लाख ६० हजार रुपये खासगी फायनान्समध्ये भरुन स्वतःच्या नावावर असलेले सोने तारण कर्ज (गोल्ड लोन) फेडल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. रक्षक असलेल्या पोलिसाने भक्षक बनून हे कृत्य केल्याने जनसामान्यात पोलसांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. संतोष तेजराव वाघ (३५, रा. घर क्र. १०५, महाल सोसायटी, साईबाबा मंदीरासमोर, चिकलठाणा) असे त्या आरोपी पोलिसाचे नाव असून तो सोयगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

या प्रकरणी सोने व्यापारी अशोक विसपुते (५३, रा. पिंप्राळा, जळगाव) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार अवघे चार महिन्यापूर्वी फोनवर ओळख झालेला आरोपी सोनेव्यापारी रामचंद्र दत्तात्रय दहिवाळ (४२, रा. साईबाबा मंदीरासमोर, हिरापूर, चिकलठाणा परिसर) याचे शेंद्र्यात भवानी ज्वेलर्स आहे. दहिवाळने विसपूतेंना ‘मला मालाची गरज आहे, तुमच्याकडच्या डिझाईन घेऊन या’ असा बहाणा करत विसपूतेंना औरंगाबादेत बोलावून घेतले, डिझाईन पसंत पडल्याचे सांगत चेक देऊन सोने द्या म्हणताच विसपूतेंनी कॅश द्या, अथवा उद्या पैसे द्या, सोने पाठवून देतो’ म्हणत निघून गेले होते. त्यानंतर पोलिस वाघ आणि व्यापारी दहिवाळ यांनी संगनमत करत पोलिसाने व्यापाऱ्याला लूटत दागिन्यांसह रोकड लंपास केली होती.

यावरुन एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी दागिन्यांसह आठ लाख ४० हजार रुपयांपैकी अडीच लाख रुपये जप्त केले होते, तर उर्वरित जवळपास सहा लाख रुपये जप्त करणे बाकी होते.

पोलिस अन् व्यापाऱ्याचे असे आहे कनेक्शन

यासंदर्भात पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले की, व्यापारी दहीवाळ आणि पोलिस अंमलदार संतोष वाघ हे एकाच परिसरात रहातात. त्यामुळे दोघांची चांगलीच ओळख आहे. विसपूतेंशी दागिन्यांचा व्यवहार फिसकटल्यानंतर व्यापारी दहिवाळ याने पोलिस अंमलदार वाघसोबत संपर्क केला आणि विसपूतेंना लूटण्याचा प्लॅन आखला गेला होता. जेव्हा विसपूतेंना वाघ याने लूटून जवळपास २० लाखांचा ऐवज हिसकावून निघाला त्याचवेळेस विसपूते यांना रक्तदाबाचा त्रास होऊन त्यांची तब्येत अचानक ढासळली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी दहिवाळ याने फिर्यादी विसपूतेंना फोनवर तब्येतीची विचारणा केल्याने पोलिस वाघ आणि आरोपी दहिवाळ यांनी संगमनताने आपल्याला लूटल्याचे स्पष्ट झाल्याने गुन्हा दाखल होऊन दोघांनाही अटक करण्यात आली होती.

सिडकोतील एका फायनान्समध्ये २ लाख ६० हजार रुपये भरुन आरोपी पोलिस वाघ याने स्वतःच्या नावावर असलेले गोल्ड लोन क्लिअर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फायनान्सला ९१ नुसार नोटीस दिली असून फायनान्सकडून सदर रक्कम हस्तगत करण्यात येणार आहे.

- विठ्ठल पोटे,

पोलिस निरीक्षक, एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे.