औरंगाबाद : नावावर पक्के घर नसेल तर पुनर्वसन

लेबर कॉलनीच्या पाडापाडीनंतर बेघरांच्या मदतीसाठी पुनर्वसन कक्ष
Pradhan Mantri Awas Yojana Labor Colony houses demolished and land seized
Pradhan Mantri Awas Yojana Labor Colony houses demolished and land seizedsakal

औरंगाबाद : बहुचर्चित लेबर कॉलनीतील घरे पाडून जागा ताब्यात घेण्यात आली. यानंतर या कॉलनीत राहणारे आणि त्यांच्या नावावर पक्के घर नसलेल्या बेघरांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात कुठेही पक्के घर नसलेल्यांना आणि या पाडापाडीमुळे बेघर झालेल्यांना या कक्षाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन, पोलिस विभाग यांनी संयुक्त कारवाई करीत लेबर कॉलनी, विश्वासनगर येथील जीर्ण झालेली घरे पाडून टाकली. कारवाईपूर्वीच बहुतांश नागरिकांनी न्यायालयाच्या आदेशाचा आदर करत साहित्य काढून घेतले होते. लेबर कॉलनी पूर्ण रिकामी करण्यास प्रशासनाला यश आले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कारवाईला सुरुवात केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. पूर्वी लेबर कॉलनीत राहणाऱ्या आणि ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही अशा नागरिकांनी या कक्षात अर्ज आणि कागदपत्रे सादर करावी, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून खात्री पटल्यानंतर त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर देण्यासाठी तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. लेबर कॉलनी भागात ४९ निवृत्त आणि १२ सध्या शासकीय सेवेत असणारे कर्मचारी होते. अन्य लोकांचा शासकीय सेवेशी कसलाही संबंध नसल्याचे ते म्हणाले.

या भागात अनेक जुनी, नवीन धार्मिक स्थळे आहेत. लेबर कॉलनीतील घरे पाडताना धार्मिक स्थळांना काहीही करण्यात आले नाही. लेबर कॉलनी भुईसपाट झाल्यानंतर प्रशासनाकडून या धार्मिक स्थळांची माहिती गोळा करण्यात येत आहे. प्रशासनाने येथील जुन्या दर्ग्याची साफसफाई केली. शासकीय नियम पाहून या धार्मिक स्थळांबाबत भूमिका घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

भंगार गोळा करणारे तुटून पडले

पूर्वीची लेबर कॉलनी भुईसपाट झाली असल्याने आता त्या ठिकाणी उरले आहेत केवळ दगड, माती अन् विटांचे ढिगारे. यामध्ये असलेले लोखंड, लाकूड, विटा, फरशी काढून देण्यासाठी गुरुवारी भंगारवाल्यांची गर्दी झाली. हा प्रकार लक्षात आल्यावर प्रशासनाने या मलब्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. लिलाव घेणाऱ्या व्यक्तीने मलब्यात लागणाऱ्या चीजवस्तू काढल्यानंतर उरलेला मलबा जेसीबीने उचलून हायवाद्वारे खाम नदीच्या काठावर टाकून रस्त्याचे मजबुतीकरण केले जाणार आहे.

३२ घरांचा किराया एकाकडूनच वसूल

लेबर कॉलनी पाडल्यानंतर आता या भागातील अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. ३३८ घरांपैकी केवळ ६१ लोकांचाच शासकीय सेवेशी संबंध होता. उर्वरित सर्व कुटुंब अनधिकृतपणे राहत होते. विशेष म्हणजे एक व्यक्ती तब्बल ३२ घरांचा किराया अनेक दिवसांपासून वसूल करीत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. इतरही अनेकांनी अशाच पद्धतीने पोटभाडेकरू ठेवून किराया गोळा केल्याचे समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com