राजर्षी शाहू महाराज : सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ - पद्माकरराव मुळे

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : छत्रपती शाहू महाराजांइतके योगदान आपल्याला देता येणार नाही पण, मनामनात रुजलेल्या या जातीच्या भिंती पाडून महाराजांच्या विचारांप्रमाणे आचरण नक्की करता येईल, असे प्रतिपादन छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे यांनी केले. कांचनवाडी येथे शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या छत्रपती शाहू महाराज म्हणजेच यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांची आज जयंती. यानिमित्त पद्माकरराव मुळे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी श्री. मुळे यांनी शाहू महाराज यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.

‘‘टोकाचा जातीभेद असणाऱ्या काळात १९१८ साली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी राज्यात लागू केला. छत्रपती शाहू महाराज हे कृतिशील समाजसुधारक होते. समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि मागासलेल्या जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच बहुजनांमध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी महाराजांनी शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले.’’

प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा १९१६ साली त्यांनी केला. या कायद्याची अंमलबजावणी नीट होण्यासाठी त्यांनी जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशा पालकांना १ रुपये दंडाची शिक्षा केली. मागासलेल्या जातींना विकासाची समान संधी मिळावी, यासाठी त्यांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात शासकीय नोकऱ्यांमध्ये मागास जातींसाठी ५० % आरक्षणाची तरतूद केली.

बहुजनांमध्ये शिक्षण प्रसाराची चळवळ सुरू केली. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहे काढली. गाव तिथे शाळा काढली. राज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी  छत्रपती शाहू महाराजांनी केवळ सामाजिक बदलाकडे लक्ष दिले नाही तर उद्योग, कला,व्यापार, क्रीडा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली. १९०६ साली  छत्रपती शाहू महाराजांनी शाहू स्पिनींग अँड व्हॅविंग मिलची स्थापना केली.

खासबाग हे कुस्तीचे मैदान बांधून १९१२ ला कुस्ती खेळाला प्रोत्साहन दिले, शाहूपुरी ही गुळाची बाजार पेठ वसविली, सहकारी कायदा करून सहकारी चळवळीस प्रोत्साहन दिले, शेतीच्या पाण्याची सोय करण्यासाठी भोगावती नदीवर जगातील मातीचे पहिले धरण बांधले असा हा सर्वांगीण विकास साधणारा दूरदृष्टी असणारा राजा होता.

छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे १९१९ साली कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना 'राजर्षी' पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. छत्रपती शाहू महाराजांइतके योगदान आपल्याला देता येणार नाही पण मनामनात रुजलेल्या या जातीच्या भिंती पाडून  छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणे आचरण आपल्याला नक्की करता येईल.

संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, विश्वस्त समीर मुळे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, अधिष्ठाता डॉ. सुभाष भोयर, प्राचार्य डॉ. डी. के. शेळके, डॉ. उल्हास शिंदे, प्रा. गणेश डोंगरे उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com