Ramzan 2023 : रमजानचा आज पहिला रोजा ; शहरात उत्साह Ramzan 2023 First Fast Commencement Special Namaz Taraweeh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इफ्तार

Ramzan 2023 : रमजानचा आज पहिला रोजा ; शहरात उत्साह

छत्रपती संभाजीनगर : रमजानच्या चंद्राचे गुरुवारी (ता. २३) संध्याकाळी दर्शन झाल्याने शुक्रवारी (ता. २४) पहिला रोजा राहणार आहे. मगरीबच्या नमाजनंतर विविध मशिदींतून रमजान महिन्याला सुरवात झाल्याची माहिती देण्यात आली. चंद्रदर्शन झाल्याने सर्व समाजबांधवांनी रमजानच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. चंद्रदर्शन झाल्याने गुरुवारी रात्री विशेष नमाज ‘तरावीह’ला सुरवात झाली.

रमजानमध्ये सायंकाळी ‘मगरीब’ नमाजच्या वेळी ‘इफ्तार’ केला जातो. दिवसभर रोजा ठेवल्यानंतर सायंकाळी इफ्तारमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे, पेंडखजूर हमखास असतात. शहरातील बाजार समिती, रोशनगेट, कटकटगेट, बुढीलाईन, शहाजंग भागात दुपारी फळांचा विशेष बाजारच भरतो. रोशनगेट, शहागंज येथे फळांची मोठी खरेदी होत असते.

जवळपास तेरा तासांचा रोजा

रमजान हा हिजरी (इस्लामिक कँलेंडर) मधील नववा महिना आहे. इस्लाम धर्मातील कलमा, नमाज, रोजा, जकात, हज या पाच स्तंभापैकी रोजा एक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पहाटे सहेरची वेळ ५.१७ मिनिटे तर सायंकाळी ६.४६ मिनिटाला इफ्तारची वेळ आहे.

म्हणजेच १३ तास १७ मिनिटांचा पहिला रोजा राहणार आहे. सध्या उन्हाळा असली तरी तापमान जास्त नसल्याने रोजे ठेवणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जगात त्या-त्या देशांच्या सूर्योदय व सुर्यास्तानुसार रोजे आणि इप्तारची वेळ असते त्यामुळे काही देशात रोजांचे तास अधिक असतात.

विशेष नमाज तरावीह

केवळ रमजान महिन्यात दिवसातील पाच नमाजांशिवाय रात्री इशाच्या नमाजनंतर ही विशेष नमाज अदा केली जाते. त्यास ‘तरावीह’ म्हणतात. याचे महत्व रमजान महिन्यात इतर नमाजपेक्षा वेगळे आहे. यामध्ये कुराणाचे पठण केले जाते. काही मशीदीत पहिल्या दहा दिवसात संपूर्ण कराणाचे पठण केले जाते. त्यामुळे मशीदीत तरावीहच्या नमाजसाठी गर्दी असते.