
औरंगाबादच्या ऋतुजा कुलकर्णी देशातील पहिल्या ‘तर्करत्न’
औरंगाबाद : थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करून तब्बल १७४ वर्षे उलटली; पण शास्त्र परंपरेच्या अभ्यासाची दारे महिलांसाठी बंदच होती. २०१४ मध्ये गोव्यातील महामहोपाध्याय देवदत्त पाटील गुरुजी यांच्या पुढाकाराने प्रथमच शास्त्र परंपरेच्या अभ्यासासाठी मुलींना प्रवेश मिळाला. सहा वर्षे गुरुकूल पद्धतीने न्यायशास्त्राचा (तर्क) अभ्यास केल्यानंतर सर्वात कठीण समजली जाणारी महापरीक्षा औरंगाबादच्या ऋतुजा कुलकर्णी यांनी उत्तीर्ण केली. त्या देशातील पहिल्या महिला ‘तर्करत्न’ ठरल्या आहेत.
वेद आणि धर्मशास्त्र प्राचीन भारताचे पवित्र साहित्य, ज्याचा जेवढा अभ्यास केला तेवढा थोडाच. अलीकडे वेदशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या गुरुकूल पद्धतीच्या संस्था ठिकठिकाणी सुरू झाल्या आहेत पण धर्मशास्त्रांच्या अभ्यासात म्हणावा तेवढा रस घेतला जात नाही. संस्कृत भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शास्त्रासबधी अभ्यासक्रम आहे. पण तो वरवरचा आहे. त्यामुळे गोव्यातील महामहोपाध्याय देवदत्त पाटील गुरुजी यांच्या वेदशाळेने शास्त्र परंपरेच्या अभ्यासासाठी प्रथमच मुलींना संधी दिली. शृंगेरी (कर्नाटक) येथील जगदगुरू शंकराचार्य यांच्या पुढाकाराने परिक्षा घेण्यात आली. त्यात देशभरातून विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यातील ऋतुजा बाळकृष्ण कुलकर्णी ही महाराष्ट्रातील एकमेव होती.
ऋतुजा व गोव्याची कल्याणी हर्डीकर या दोघींनी सहा वर्षे गुरुकूल पद्धतीने श्रीविद्या पाठशाळा रिवान येथे न्यायशास्त्राचा (तर्क) अभ्यास केल्यानंतर सर्वात कठीण समजली जाणारी महापरीक्षा उत्तीर्ण केली. यात देशातील पहिली महिला तर्करत्न ठरली ती ऋतुजा कुलकर्णी. शृंगेरी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या उपस्थितीत १८ व १९ ऑगस्टला परीक्षा आयोजित करण्यात आली होती. गुरुदेव क्षीरसागर महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
२२ ग्रंथांच्या आधारावर परीक्षा
यासंदर्भात ऋतुजाने सांगितले की, सहा शास्त्र आहेत. यातील न्याय, व्याकरण शास्त्रच मुलींना शिकता येते. कला शाखेत १२ वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर न्यायशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. सहा वर्षाच्या काळात २२ विविध जुन्या संस्कृत ग्रंथाच्या आधारावर प्रत्येक सहा महिन्याला परिक्षा घेतली गेली. नगर येथील दत्त देवस्थान संचलित वेदशास्त्रपरीक्षण परिषदेतर्फे परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ही परीक्षा लेखी व मौखिक दोन्ही प्रकारची असते.
मराठवाड्यात करायचे आहे काम
मुलींसाठी न्याय, व्याकरण शास्त्र शिकवण्याची परवानगी देताना जगद्गगुरूंनी ही परंपरा गुरुकूल पद्धतीने पुढे सुरू ठेवण्याची अट टाकली होती. मराठवाड्यात शास्त्राच्या अभ्यासाची सुविधा नाही. त्यामुळे ही सुविधा मराठवाड्यात सुरू झाल्यानंतर त्या माध्यमातून काम करायचे आहे, असे ऋतुजा यांनी सांगितले.
काय आहे तर्कशास्त्र?
विश्वाच्या निर्मितीच्या अनुषंगाने ऋषिमुनींनी अनेक ग्रंथ लिहले आहेत. या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून तर्काच्या आधारे हे ज्ञान सोप्या भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोचविणे हे तर्कशास्त्राच्या अभ्यासाचे उद्दिष्ट असल्याचे ऋतुजा कुलकर्णी हिने सांगितले.