Sambhaji nagar accident : रिक्षाचालकाने कट मारला अन् चार वाहनांचा विचित्र अपघात Sambhaji nagar accident Rickshaw driver involving four vehicles | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात

Sambhaji nagar accident : रिक्षाचालकाने कट मारला अन् चार वाहनांचा विचित्र अपघात

छत्रपती संभाजीनगर : कट मारत मारत अती वेगात जाणाऱ्या रिक्षाचालकाने इतर वाहनांना कट मारत अचानक वळण घेतले अन् त्याचवेळी लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचालकाने रस्त्यात बस थांबवत अपघात होता होता वाचविला. दरम्यान जाणाऱ्या कारचालकाचा वेग कमी असल्याने काही अंतरावर तोही थांबला. परंतू, त्यामागून भरधाव वेगात आलेल्या मालवाहू पिकअपने कारला जोराची धडक दिली.

या धडकेत कार समोरील ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली. हा विचित्र अपघात मंगळवारी (ता.६) सायंकाळी साडेपाच वाजता सेव्हनहिल उड्डानपुलाजवळ घडला. या अपघातात कारचालक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मंगळवारी सायंकाळी तन्वी कंपनीची ट्रॅव्हल्स (एम एच २० - एफ के - ९२८८) लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात होती. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सेव्हनहिल उड्डानपुलावरुन सिडको बसस्थानकाच्या दिशेने जात असताना पुल उतरताच जुन्या एअर इंडियाच्या कार्यालयासमोर अचानक एका सुसाट रिक्षाचालकाने निष्काळजीपणे बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत समोर रिक्षा घातली.

यात अपघाताची शक्यता वाटल्याने ट्रॅव्हल्स चालकाने बस जागीच थांबवली. त्या मागेच महिंद्रा एक्सयुव्ही (एम एच २३ -बी ए - ५९९९) होती. त्यात चालकाने प्रसंगावधान राखत बस पासून अंतरावर कार थांबवली. मात्र, त्या मागून येत असलेल्या सुसाट माल वाहतूक करणारा छोटा हत्ती रिक्षाने चारचाकीला धडक दिली.

धडक एवढी जोरात होती की एक्सयुव्ही त्या धडकेत ट्रॅव्हल्स वर जाऊन आदळली. यात तीचे दोन्ही बाजुने मोठे नुकसान झाले. शिवाय, आतील दोघेही काचेवर येऊन आदळल्याने डोक्याला गंभीर जखम झाली. अनुराग परदेशी (३१) यांच्यासह दोघे गंभीर जखमी झाल्याचे सिडको पोलिसांनी सांगितले.