
Sambhaji nagar : नामांतरानंतर भडकले शहरात राजकारण
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झाल्यानंतर भाजप, शिंदे गट, ठाकरे गट यांच्यात श्रेयवादाची लढाई झाली. आता नामांतराच्या मुद्यांना कॅश करत महापालिका आणि लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन भाजपसह शिवसेना (शिंदे गटाकडून) जोरदार तयार केली जात आहे.
हिंदू जनगर्जना मोर्चा हा भाजप आणि शिवसेना (शिंदे गटासाठी) एक प्रकारे लिटमस्ट टेस्ट होती. या मोर्चाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मोर्चातून हिदुत्ववादी संघटनांना एकाच मंचावर आणण्यात यश आले त्यामुळे भाजप छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर ताकदीने दावा करण्याची शक्यता बळावत चालली आहे.
तर दुसरीकडे नामांतराच्या मुद्याला घेऊन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी १४ दिवसांचे उपोषण केले. कॅन्डल मार्च काढला इतकेच नव्हे तर गल्लोगल्ली त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आक्षेप अर्ज भरुन घेण्यासाठी शिबिर लावण्यात आले आहे. महापालिका आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नामांतराचे समर्थक आणि विरोधक मोर्चा, रॅली, उपोषण अशा शक्तीप्रदर्शनातून राजकीय फायदा घेण्यासाठी कोणती ही कसर सोडतांना दिसत नाहीत.
नामांतराची घोषणा झाल्यापासून छत्रपती संभाजीनगर शहरात समर्थक आणि विरोधी गट एकमेकांच्या विरोधात उभे आहे. इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १४ दिवसांचे उपोषण केले. काही तरुणांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्यानंतर यावर जोरदार टीका झाली.
परवानगी नसतांना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकलगेटपर्यंत कॅन्डल मार्च काढला. आता पुढील लढाई कायदेशीर पद्धतीने लढू असे सांगत त्यांनी उपोषण मागे घेतले. यातून त्यांनी आगामी महापालिका निवडणुक तसेच लोकसभेसाठी अल्पसंख्याक बहुल भागात आपली पकड मजबुत करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे बिगर राजकीय संघटना मुस्लिम नुमाईंदा कौन्सिलच्या धरणे आंदोलनाला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा स्वप्नपुर्ती रॅलीकाढून छत्रपती संभाजीनगर नामकरणाचे समर्थन करत इम्तियाज जलील यांचा विरोध केला होता. यानंतर शहरात रविवारी हिंदु जनगर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी भाजप, शिंदे गट, मनसेसह विविध संघटना सोबत असल्या तरी भाजपने या मोर्चातून महापालिका, लोकसभा निवडणुकीची एक प्रकारे चाचपणी केली. मोर्चाला परवानगी नाकारलेली असली तरी हिंदुत्व आणि छत्रपती संभाजीनगरच्या मुद्यावर लोकांचा या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला.
मोर्चात आणि व्यासपीठावर भाजपाचा बोलबाला राहिला यात भाजपचे सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, शिरिष बोराळकर, प्रमोद राठोड, विजय औताडे, बसवराज मंगरुळे, समीर राजुकर, शिवाजी दांडगे, किशोर शितोळे, हर्षवर्धन कराड यांचा समावेश होता.
नामांतर केल्याबद्दल प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत शपथ देण्यात आली. यावेळी उपस्थित एका गटाने मोदी मोदी चा गजर ही केला. पत्रकार सुरेश चव्हाणके, आमदार राजासिंह ठाकूर हे राष्ट्रीय स्तरावर भाजपला पुरक ठरेल असा प्रचार करत आले आहे. या दोघांना शहरात आणण्यात भाजपचाच मोठा वाटा होता.
युतीत छत्रपती संभाजीनगरची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला होती. मात्र मतांच्या विभागणीत चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता. येथे शिवसेना पराभुत झालेली होती त्यामुळे या जागेवर भाजपकडून आतापासून अप्रत्यक्षपणे दावा सांगितला जात आहे.
सन २०१९ पासून येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे इच्छुक आहेत. ही जागा भाजपलाच सुटावी यासाठी ते प्रयत्नशील दिसतात. असे असले तरी शिंदे गट ही जागा सहजासहजी भाजपसाठी सोडणार नाही असे दिसते. याबद्दल भाजप आणि शिंदे गट हे उघडपणे बोलले नाही. तरीही भाजपकडून लोकसभासाठी अगदी बुथस्तरापासून तर पन्नाप्रमुख पर्यंत तयारी सुरु आहे. यासाठी अनेक नेत्यांच्या बैठका झाल्या आहे.
आता नामांतराच्या मुद्याला कॅश करुन महापालिका, लोकसभा निवडणुकीसाठी आपली बाजू भक्कम करण्याचा भाजप, शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे एमआयएम ही हा मुद्दा कॅश करुन आपली बाजू भक्कम करु पाहत आहे. या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे गटाने नामांतर झाल्यानंतर जल्लोष केला मात्र ते हिंदु जनजर्गना मोर्चापासून लांब राहिला.