Sambhaji nagar : माथेफिरूने फोडल्या चार कार Sambhaji nagar ailway station in Karnapura Four cars smashed head-turners | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cars

Sambhaji nagar : माथेफिरूने फोडल्या चार कार

छत्रपती संभाजीनगर : मानसिक संतुलन बिघडलेल्‍या ३५ वर्षीय माथेफिरूने रस्त्याने जाणाऱ्या कारवर अचानक दगडांचा मारा केला. यात चार कारचे जवळपास पाच हजार रुपयांचे नुकसान झाले.

ही घटना बुधवारी (ता.१५) सकाळी कर्णपुऱ्यातील रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गॅस पंपाजवळ घडली. विशेष म्हणजे, चालकांनी कार थांबवून युवकाला बेदम चोप दिला. पोलिसांनी धाव घेत युवकाला ताब्यात घेतले. संजय मगन गांगे (वय ३५, रा. गल्ली क्रमांक २, मुकुंदवाडी) असे त्याचे नाव आहे.

यासंदर्भात वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बॅंकेचे शाखा व्यवस्थापक पराग मोहन गुजराती (वय ४५) यांनी तक्रार दिली की, बुधवारी (ता.१५) ते सकाळी दहादरम्यान (एमएच २०, जीई ४५९२) कारने महावीर चौकाकडून रेल्वेस्थानकाकडे जात असताना पदमपुरा भागातील कर्णपुरा परिसरातून जात असताना संजय याने अचानक कारवर दगड मारण्यास सुरवात केली.

राजाराम बाबूराव दिंडे (६२) यांच्याही कारचे नुकसान झाले. एकेक करत अशा चार कारवर संजयने दगड मारले. दरम्यान काही कारचालकांनी त्याला धरून चांगलाच चोप दिला. मात्र मारहाण होत असलेली पाहून राजाराम यांनी कसेबसे संजय याला वाचविले. सुदैवाने एकाही कारचालकाला मार लागला नाही.

या प्रकरणाची माहिती मिळताच वेदांतनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल कंकाळ यांनी पथकासह धाव घेतली. त्याच वेळेस पोलिस अंमलदार स्वाती बनसोडे या पोलिस ठाण्यात जात असताना त्यांनीही धाव घेतली. याप्रकरणाची नोंद वेदांतनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली.