
Sambhaji nagar : पाणीपट्टी वसुलीच्या नावाने बोंबाबोंब
छत्रपती संभाजीनगर : आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे बारा दिवस शिल्लक राहिले आहेत. पुन्हा त्यात तीन दिवस सार्वजनिक सुट्या आलेल्या आहेत. तरी शहरातील पाणीपट्टी वसुलीच्या नावाने ठणाणाच सुरू आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी वसुलीचे १३० कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ २० कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे. हे प्रमाण अवघे १६ टक्के इतके आहे.
महापालिकेकडून शहरातील बहुसंख्य भागात नळ योजनेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्याबदल्यात गेल्यावर्षी पर्यंत निवासी नळ कनेक्शनसाठी वर्षाला ४०५० रुपये एवढी पाणीपट्टी आकारली जात होती. मात्र, शहरात नळाला पाच ते सहा दिवसाआड एकदा पाणी मिळते. त्यामुळे पाणीपट्टीत कपात करण्याची नागरिकांची मागणी होती.
त्यानुसार जून २०२२ मध्ये महापालिकेने पाणीपट्टीची रक्कम ४०५० रुपयांवरून २०२५ रुपये एवढी कमी केली. मात्र, आता त्याचा परिणाम महापालिकेच्या वार्षिक पाणीपट्टी वसुलीवर झाला आहे. महापालिकेच्या कर वसुली विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा पाणीपट्टीचे १३० कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
१३ मार्चपर्यंत प्रत्यक्षात २० कोटी ७६ लाख रुपयांचीच वसुली होत आहे. हे प्रमाण उद्दिष्टांच्या तुलनेत केवळ १६ टक्के इतके आहे. आता राहिलेल्या दहा-बारा दिवसात यामध्ये फार तर चार ते पाच कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. तसे झाले तरी यंदाची पाणीपट्टी वसुली २५ कोटींच्या आतमध्येच राहण्याची शक्यता आहे.