
Sambhaji nagar : शहरात शांतता, सलोखा अबाधित राखा
छत्रपती संभाजीनगर : नामांतरानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील सामाजिक शांतता व सलोख्यासाठी मराठवाडा इन्व्हायर्नमेंटल केअर कल्स्टरच्या माध्यमातून शहरातील उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. नुकतीच डब्ल्यु-२० बैठक शहरात झाली. यात प्रशासनाने उत्तम भूमिका पार पाडली.
या आयोजनात सर्वच व्यावसायिक, व्यापारी, औद्योगिक संघटनांचा सक्रीय सहभाग होता. त्यानिमित्ताने शहराचे नवे रुप जगाला दाखवता आले. जगातिक स्तरावर शहराचे नाव अधिक परिणामकारक पद्धतीने मांडता येण्याविषयी आता आशा पल्लवित झाल्या आहे. मात्र मागील काही दिवसांपासून शहरात नामांतरावरुन परस्परविरोधी वक्तव्ये व निवेदन प्रसारित केली जात आहे.
यात सर्वसामान्य जनतेत अस्वस्थता निर्माण करु शकेल अशी शंका वाटते. अशा परिस्थितीत शहरांमध्ये कोणत्याही प्रकारची सामाजिक अशांतता निर्माण होणे हे कोणालाच परवडणार नाही. कोणत्याही अशांततेचा पहिला परिणाम दुर्देवाने व्यापार, उद्योग, पर्यटन आणि पर्यायाने सामान्य माणसाच्या दैनंदिन रोजीरोटीवर होतो.
त्यामुळे सर्व विचारधारेच्या प्रमुखांना एकत्र बोलावुन सामंजस्याने संबंधित विषय मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर उद्योजक राम भोगे, ऋषी बागला, मानसिंग पवार, प्रशांत देशपांडे, मुकुंद कुलकर्णी, प्रसाद कोकिळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.