
Sambhaji nagar : एकाच दिवशी निघाले १७ पॉझिटिव्ह
छत्रपती संभाजीनगर : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी (ता. १८) १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या आता ३८ वर पोचली आहे.
शहरात इन्फ्लूएंझा एच ३, एन २ या नव्या साथीसह पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. घरोघरी ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. विशेष म्हणजे इन्फ्लूएंझा एच ३ एन २ च्या साथीचे व कोरोनाचे लक्षणे सारखीच आहेत.
त्यामुळे महापालिकेने कोरोना चाचण्या सुरू केल्या आहेत. गेल्या २४ तासात घेतलेल्या चाचण्यांचे शनिवारी अहवाल आले. त्यात तब्बल १७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. शनिवारच्या चाचण्यांचा पॉझिव्हिटी रेट तब्बल १३.८२ टक्के एवढा आहे. शनिवारी आढळलेल्या १७ नवीन रुग्णांमुळे सध्या ३८ सक्रिय रुग्ण झाले आहेत.
हे सर्व रुग्ण घरी बसूनच उपचार घेत आहेत. दोन रुग्ण खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल होते, त्यांना शनिवारी सुटी देण्यात आली, असे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने मेल्ट्रॉन रुग्णालयात सज्ज ठेवण्यात आले आहे.
त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेऊन उपचार देणे गरजेचे आहे, अशा रुग्णांना मेल्ट्रॉनमध्ये हलवले जाणार आहे. दरम्यान शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी घराबाहेर वावरताना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, घरी गेल्यावर हात साबणाने धुणे, लहान मुलांची काळजी घेणे या प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले.