
Sambhaji nagar : जुनी पेन्शनच्या संपामुळे जिल्ह्यात कामकाज ठप्प
छत्रपती संभाजीनगर : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मुख्य मागणीसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता.१४) पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सरकारी कार्यालयातील कामकाज या संपामुळे ठप्प झाले होते.
कार्यालयापुढे ‘आता माघार नाही, एकच मिशन जुनी पेन्शन’ अशा घोषणा देत सर्व कर्मचारी एकत्र आले. जिल्ह्यातील ४० हजार शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले असून संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
पैठण ः अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी पैठण तालुक्यातील महसुल, पंचायत समिती, नगर पालिका या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देऊन संप सुरु केला.
यामुळे मंगळवारी(ता.१४) पैठण तालुक्यातील प्रशासनाचे कामकाज ठप्प झाले होते.जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी कर्मचारी संघटनांनी राज्यस्तरीय संघटनेच्या नेतृत्वात राज्य सरकारकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे.
मात्र, सरकारने या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही. त्यामुळे जुन्या पेन्शनसाठी शासकीय व निमशासकीय कर्मचारी आक्रमक झाले असून बेमुदत संप सुरु केला आहे. त्यामुळे मंगळवारी पैठण येथील सर्व शासकीय कार्यालयात संपामुळे शुकशुकाट दिसून आला.
आजपर्यंत अनेक संघटनांनी जुन्या पेन्शनसाठी आंदोलन केले आहे. या संपात राज्यातील सर्वच कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत. बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन जुनी पेन्शन संघटनेने केले आहे.
जुन्या पेन्शनमध्ये ग्रॅज्युटी, जीपीएफ, महागाई भत्ता, मृत्यूनंतर वारसदारालाही पेन्शन मिळत होती. नव्या पेन्शनमध्ये अशी कोणतीही सवलत नाही. जुन्या पेन्शनमध्ये पैसा हा सरकारी योजना किंवा वित्तीय संस्थामध्ये लावलेला असायचा. त्यामुळे त्याची हमी होती. नव्या पेन्शनमध्ये अप्रत्यक्षपणे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात होणारा पैसा शेअर बाजारात लावला जातो. यात हमीची शक्यता नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.