
Sambhaji nagar : घरकूल निविदा घोटाळ्यात सहा अधिकाऱ्यांना नोटिसा
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजना निविदा घोटाळ्याचा ईडीमार्फत तपास सुरू आहे. त्यात आता निविदा कमिटीतील सहा अधिकाऱ्यांना महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी नोटीस बजावली आहे. यासंदर्भात शासनाने आदेश दिले आहेत, त्यामुळे या अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला जात असल्याचे डॉ. चौधरी यांनी सोमवारी (ता. २०) सांगितले. त्यात तत्कालीन अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
पंतप्रधान आवास योजनेसाठी महापालिकेने राबविलेली निविदा प्रक्रिया सध्या राज्यभर गाजत आहे. अधिकाऱ्यांनी घाई गडबडीत ही निविदा प्रक्रिया राबवत घोटाळा केल्याचा आरोप आहे. दरम्यान, महापालिकेने राज्य शासनानातर्फे नियुक्त चौकशी समितीच्या अहवालानंतर या प्रकरणी १९ संचालकांवर गुन्हे दाखल केले आहे.
कंत्राटदारांनी रिंग करून महापालिकेची फसवणूक केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एकीकडे या प्रकरणाची चौकशी पोलिसांमार्फत सुरू आहे तर दुसरीकडे शुक्रवारी (ता. १७) ईडीने शहरात विविध कंपन्यांच्या नऊ कार्यालयांवर छापेमारी केली. आता महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी निविदा प्रक्रियेतील म्हणजेच समितीमधील सहा अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
यासंदर्भात डॉ. चौधरी यांनी सांगितले की, शासनाने निविदा प्रक्रियेतील संबंधित अधिकाऱ्यां कडून खुलासा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तत्कालीन अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, उपायुक्त अपर्णा थेटे, तत्कालीन शहर अभियंता सखाराम पानझडे, तत्कालीन नगर रचना उपसंचालक ए. बी. देशमुख यासह सहा अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
पांडेय यांच्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय
पंतप्रधान आवास योजनेचा सुमारे ३९ हजार घरांचा चार हजार कोटींचा डीपीआर मंजूर झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी सात अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली होती. त्यात तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांचाही समावेश होता. याविषयी विचारणा केली असता, पांडेय यांना वगळून उर्वरित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तत्कालीन आयुक्त हे माझ्या अधिकारात येत नाहीत, त्यामुळे शासनस्तरावर निर्णय होईल, असेही चौधरी यांनी सांगितले.
पोलिसांनी नोंदवले अधिकाऱ्यांचे जबाब
निविदा भरताना कंत्राटदारांनी रिंग केल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेने सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू असून, काही अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यासोबतच आता महापालिकेमार्फत व इडीकडूनही या निविदा प्रक्रियेचा तपास सुरू आहे.