
Sambhaji nagar : शिकाऊ परिचारिका देताहेत रुग्णसेवा ; रुग्णसेवेला मिळतोय आधार
छत्रपती संभाजीनगर : जुन्या पेन्शनसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) ७०० हून अधिक परिचारिका आणि वर्ग तीन व वर्ग-चारचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. यामुळे घाटीत रुग्णसेवेवर परिणाम जाणवत आहेत. उपाय म्हणून घाटीतर्फे २१० शिकाऊ परिचारिकांच्या माध्यमातून सेवा देण्यात येत आहे.
बुधवारी (ता.१५) अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी वर्ग चारचे अतिरिक्त २० कर्मचारी आणि १५ परिचारिका घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय कल्याणकर यांनी दिली.
घाटी रुग्णालय प्रशासनाने रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी बजाजच्या नर्सिंग महाविद्यालयाचे ६० विद्यार्थी आणि घाटी नर्सिंगच्या १६० विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये नेमलेले आहे. यासह १५ सुरक्षारक्षक डॉक्टरांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहे.
बुधवारी दिवसरात तीन इमर्जन्सी शस्त्रक्रिया, १६ प्रसूती करण्यात आल्या. दोन सिझर आणि इमर्जन्सी वॉर्डात ३८ जणांना दाखल करण्यात आले. आजच्या सुटीमुळे घाटीचा बाह्यरुग्ण विभाग बंद होता. यासह ११७० उपचार घेणाऱ्या रुग्णांना सेवा कमी पडू नये,
याची विशेष काळजी घेण्यात आली. यासह रुग्णांना जेवणही वेळेवर देण्यात आले. यासाठी भोजन तयार करणारे ११ पैकी ८ जण आज कामावर हजर होते. पाणीपुरवठा करणारे कर्मचारीही हजर होते, अशी माहिती डॉ. कल्याणकर यांनी दिली.
रुग्णांचे नातेवाइकही आधार
वॉर्डा-वॉर्डात आज रुग्णांच्या नातेवाइकांची संख्या मोठी होती. परिचारिका नसल्याने नातेवाइकांनीच रुग्णांसोबत राहत डॉक्टरांना मदत केली. साफ-सफाईसाठी काही प्रमाणात सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते. अनेक नातेवाइकांनाच स्ट्रेचर्स ओढावे लागले. तथापि, कुणी तक्रार केली नाही.
संपामुळे अधिष्ठातांनी वीस कर्मचारी, १५ परिचारिकांची अतिरिक्त मागणी केली आहे. ओपीडी बंद असल्याने आजतरी डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा भार नव्हता. अधिष्ठाता डॉ. राठोड यांनी संपावर गेलेल्यांना परत कामावर येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी परत येत कामावर रुजू होत मानवता धर्म पाळावा हेच आवाहन आहे.
- डॉ. विजय कल्याणकर, वैद्यकीय अधीक्षक