
Sambhaji Nagar : बाजार समितीत आता सभापतिपदासाठी चुरस
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना (शिंदे गटाने) घवघवीत यश मिळविले. यामुळे आता सभापतीपदासाठी भाजपमधून हालचाली सुरु झाल्या आहेत. यात माजी सभापती राधाकिसन पठाडे प्रमुख दावेदार आहे.
मात्र, पहिल्यांदाच बाजार समितीच्या निवडणुकीत उतरलेले अभिजित देशमुख यांच्यातर्फेही सभापतीपदासाठी प्रयत्न केला जात आहे. यासह भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके शर्यतीत आहे. या संदर्भात उमेदवारांतर्फे मंत्र्यांच्या भेटी-गाठी घेत फिल्डिंग लावली जात असल्याचीही चर्चा आहेत.
जिल्ह्यातील महत्त्वाची बाजार समिती म्हणून छत्रपती संभाजीनगर परिचित आहे. मुळ काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही बाजार समिती माजी सभापती श्री पठाडे यांनी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या माध्यमातून भाजपच्या ताब्यात आणली. काँग्रेसचे काही संचालक सोबत घेत पठाडे यांनी अडीच वर्षे बाजार समितीचे कारभार सांभाळला.
यात अनेक विकासाची कामे केली. त्यानंतर कोरोनामुळे बाजार समितीच्या निवडणूका लांबणीवर पडल्या. बाजार समितीचा कारभार हा प्रशासक, प्रशासक मंडळाकडे दोन ते अडीच वर्षे होता. या निवडणुकीत ही बाजार समिती पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.
त्यात केवळ चार जागा मिळाल्या. दुसरीकडे मात्र भाजप-शिवसेना शिंदे गटाने ११ जागांवर दणदणीत विजय मिळवत बाजार समितीवर वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीत पठाडे यांना मोठा रोल राहिला आहे. मात्र त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झालेले आहे. याचाच फायदा उचलत यावेळी सभापतीच्या शर्यतीत श्रीराम शेळके आणि गणेश दहिहंडे यांच्याही हालचाली सुरु आहे. सध्यातरी विजयाच्या आनंद साजरी करीत असताना दुसरीकडे फिल्डिग लावत सभापतीची माळ आपल्या गाळ्यात पाडण्यासाठी तयारी सुरु आहे.
कुणाला संधी मिळते याकडेच सर्वांचे लक्ष
जिल्ह्या बँकेच्या निवडणुकीत अभिजित देशमुख यांचा पराभव झाला होता. तो पराभव त्यांच्या मित्रमंडळाच्या चांगलाच जिव्हारी लागला. यामुळे त्या पराभवाची परतफेड म्हणून बाजार समितीचा सभापती बनविण्यासाठी देशमुख यांना बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप- शिंदे गटाच्या पॅनल मधून उभे करून निवडून आणण्यात आले. बाजार समितीच्या सभापतीपदासाठी देशमुख यांचे नाव काही पुढे करण्यात आले.
यामुळे निकालाच्या जल्लोषानंतर लगेचच देशमुख हे विनोद पाटील यांच्यासह पालकमंत्री संदीपान भुमरे, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीला गेले. पालकमंत्री आणि केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री दानवे यांच्या आशीर्वादाने देशमुख यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसकडून सभापती पदाचे उमेदवार जगन्नाथ काळे होते. मात्र, त्यांच्या पॅनलमधील केवळ चार जण निवडून आल्यामुळे काळे सभापतीच्या निवडीतून बाहेर पडले. यामुळे पठाडे की अभिजित देशमुख की शेळके कोणाला संधी मिळते याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.