
Sambhaji nagar : बाजार समितीसाठी राजकारण तापणार
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या निवडणूकीसाठी सोमवारपासून (ता.२७) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, लासूर स्टेशन, वैजापूर, कन्नडच्या बाजार समितीसाठी २८ तर फुलंब्री, पैठण, गंगापूर या बाजार समितीची ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
यासाठी पालकमंत्री संदीपान भुमरे,आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, माजी आमदार कल्याण काळे यांनी पॅनलसाठी उमेदवारांची जुळवा-जुळव करणे केले केले आहे.
कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केले. गेल्या वेळी ज्यांच्या ताब्यात बाजार समित्या होत्या. ते संचालक पुन्हा ॲक्टिव्ह झाले असून पुन्हा गेल्या दोन ते तीन महिन्यापासून तयारी करीत आहेत. विशेष करुन नवीन मतदारांची नोंदणीही करीत ते मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी सर्वांचा खटाटोप सुरु आहे.
या सात बाजार समितीपैकी सर्वांचे लक्ष हे छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, लासूर, फुलंब्री,पैठण या बाजार समितीवर आहे. या ठिकाणी मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. आता शिवसेनेचा शिंदे गट भाजप सोबत गेला.
तर ठाकरेगट हा महाविकास आघाडी सोबत आहे. यात सोसायट्या, ग्रामपंचायत यांच्या संख्याबळानुसार पॅनल जुळविण्याचे समीकरण केले जाणार आहे. यासह व्यापारी वर्गातूनही अनेक व्यापारी बाजार समितीवर जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याच अनुषंगाने या व्यापाऱ्यांतर्फे काही वर्षांपासून भाजप, शिंदेगट, ठाकरेगट, काँग्रेस यांच्याशी जवळीक साधून आहे.
छत्रपती संभाजीनगर बाजार समिती पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजप आमदार बागडेंच्या नेतृत्वातील तयारी करीत आहे. बागडे या बाजार समितीवर विशेष लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे पुन्हा बाजार समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी शिवसेनानेते चंद्रकांत खैरे, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाणही बाजार समितीत ताकद लावणार आहे. बाजार समितीसाठी सोसायटीसाठी ९३४ मतदारसंघ, ग्रामपंचायत १०९८ मतदार, व्यापाऱ्यांचे ८५८ मतदार आहे. तर हमाल-मापाडी ४९७ मतदार आहेत.
पॅनेलमध्ये संधी न मिळाल्यास दुसऱ्या पक्षात उड्या
फुंलब्री बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी आमदार बागडेंचे वर्चस्व पणाला लागणार आहे. तर पैठणला पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह भाजप बाजार समितीत ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीला कडवी टक्कर द्यावी लागणार आहे.
गंगापूर कारखान्याच्या माध्यमातून झालेला पराभवानंतर लासूर आणि गंगापूर बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. वैजापूर बाजार समितीत ठाकरे गट,
राष्ट्रवादी यांना टक्कर देत समिती ताब्यात घेण्यासाठी शिंदे गट आणि भाजपला जड जाणार आहे. कन्नड बाजार समितीतही भाजप-शिंदे गटाला मोठी कसरत करावी लागेल असेच चित्र आहेत. पॅनलमध्ये संधी न मिळाल्यास इतर पक्षात इच्छुक उड्या मारतील हे निश्चित आहे.