
Sambhaji nagar : अल्पसंख्याकबहुल भागात शहर बंदला संमिश्र प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर : नामांतराच्या विरोधात मुस्लिम अवामी कमिटीतर्फे शहर बंदच्या आवाहनाला अल्पसंख्याक बहुल भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर जुन्या शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंद असल्याची माहिती असल्याने जुन्या शहरात बहुतांश ग्राहक खरेदीसाठी फिरकले नाहीत.
नामांतराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे. त्यानंतर मुस्लिम अवामी कमिटीने बंदची घोषणा केली होती. शुक्रवार असल्या कारणाने अल्पसंख्याक बहुल भागातील दुकाने सकाळच्या सत्रात बंद राहिली. शुक्रवारी सकाळी बेगमपुरा, टाऊन हॉल, बुढ्ढीलाईन, भडकलगेट,
जुनाबाजार, कबाडीपुरा, सिटीचौक, रोहिला गली, देवडी बाजार, सिटी चौक, मंजूरपूरा, चेलीपुरा, शहागंज, शहाबाजार, नवाबपुरा, जिन्सी, चंपा चौक, रोशनगेट, बारी कॉलोनी, किराडपुरा, रहमानिया कॉलोनी, सेंट्रल नाका, बायजीपुरा, कटकटगेट, सिल्कमिल कॉलोनी, सादातनगर रेल्वे स्टेशन परिसरात बंदचा परिणाम दिसून आला.
दरम्यान, लोकविकास परिषदेतर्फे शुक्रवारी दुपारी भडकलगेट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी न दिल्याने मोर्चा रद्द झाला. त्यामुळे मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नामांतरविरोधी कती समितीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणस्थळी एकच गर्दी केली होती. यामुळे या ठिकाणी वाहतुक कोंडी झाली.
शहराच्या नावाबद्दल निर्णय जनतेचा
उपोषणस्थळी जमलेल्यांना संबोधित करताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, सरकारला वाटत असेल की आम्ही जो निर्णय घेवू तो सर्वांनी मान्य करायला हवे तर आम्ही याच्या विरोधात आहोत. मी ही लढाई शहरातील नागरिकांच्या विश्वासावर लढत आहे. नगरसेवक, आमदार, खासदार निवडण्याचा अधिकार येथील जनतेचा आहे तसाच शहराचे नाव काय पाहिजे हे ठरवण्याचा व त्याचा निर्णय देखील जनतेचाच आहे.