
Sambhaji nagar : RTE अर्ज भरण्याची आज शेवटची संधी
छत्रपती संभाजीनगर : बालकांच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची शनिवारी (ता.२५) शेवटची संधी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ५४७ शाळांमधील ४ हजार ७३ जागांसाठी १९ हजार ९१२ अर्ज भरण्यात आलेले आहेत.
ऑनलाइन प्रक्रिया एक मार्चपासून सुरू झाली होती. १७ मार्च ही अखेरची तारीख होती. परंतु, नोंदणीसाठीचे संकेतस्थळाला येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आज अर्ज नोंदणीसाठी शेवटची संधी आहे.
वंचित गटातील बालकांच्या पालकांसाठी वार्षिक कमाल उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब, क, ड), इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग बालके,
अनाथ बालके, एचआयव्ही बाधित किंवा एचआयव्ही प्रभावित बालके व ज्यांचे पालक एक किंवा दोन्हीचे निधन एक एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोरोना प्रार्दुभावामुळे झालेले आहे अशी कोविड प्रभावित बालके यांचा या गटात समावेश आहे. ज्या बालकांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत आहे त्याचा आर्थिक दुर्बल घटकात समावेश करण्यात येतो.
प्रक्रियेत आरटीई प्रवेश देणाऱ्या शाळांना प्रत्येक प्रवेशासाठी दरवर्षी शासनाकडून १७ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते. इयत्ता आठवीपर्यंत हे अनुदान मिळते. त्यामुळे अनेक शाळा या प्रवेशासाठी जाणीवपूर्वक नोंदणी करतात. परंतु, या शाळा आरटीईचे निकषाप्रमाणे या विद्यार्थ्यांना सुविधा देतात का हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी सूरज जयस्वाल यांनी या शाळा आरटीई निकषाचे पालन करतात की नाही याची तपासणी केली होती. तेव्हा धक्कादायक अहवाल प्राप्त झाले होते. अनेक शाळा निकषाची पुर्तता करीत नसल्याचे देखील सिद्ध झाले होते.