
Sambhaji nagar : दोन्ही शिवसेनेची अस्तित्वाची लढाई
पैठण : राज्यातील राजकारणासह शिवसेनेत मोठी राजकीय उलथापालथ झाली. पैठण तालुक्यातही सेनेला सुरुवातीच्या काळात खिंडार पडले. मात्र, नंतर त्याचा फारसा परिणाम पैठण तालुक्यात दिसून आलेला नाही.
निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह हे शिंदे गटाला दिल्याने तालुक्यात पुन्हा घडामोडी घडतील, अशी चर्चा होती. परंतु त्यानंतर शिंदे गटाकडे कुणीही गेलेले नाहीत. सध्या दोन्ही गटांकडून अस्तित्वाची लढाई लढली जात आहे.
एकीकडे पालकमंत्री व कॅबिनेट पदाची संदीपान भुमरे यांची सत्ता तर दुसरीकडे शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे पाठबळ. असे चित्र पैठण तालुक्यात आहे.
पैठण तालुका हा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. तालुक्यात शिवसेनेचेच प्राबल्य राहिलेले आहे. पैठण तालुक्यात ठाकरे गटाला मानणारा मोठा वर्ग आहे. असंख्य शिवसैनिकांची आजही ठाकरे गटावर निष्ठा कायम आहे. सुरुवातीच्या काळात शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटांमध्ये कार्यकर्ते गेले नाही;
परंतु नंतर मात्र सत्तेच्या मोहापायी काही आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले. या मागचे कारण आगामी आर्थिक लाभ असल्याचे बोलले जात आहे. या पूर्वीच्या निवडणुकीत शिवसेनेने तालुक्यात विधानसभांसह स्थानिक स्वराज्य संस्थेतही दबदबा कायम राखला आहे. परंतु आता तालुक्यात शिंदे व ठाकरे गटाच्या राजकारणात उलथापालथ सुरू झाली असल्याचे दिसत आहे.
दरम्यान मूळ ठाकरे शिवसेनेने या तालुक्यावर सुरवातीपासून लक्ष केंद्रित केले आहे. पक्षफुटीनंतर युवा नेते आदित्य ठाकरे यांनी तालुक्यात शिवसंवाद यात्रा घेत पक्ष बळकटीसाठी आवाहन केले होते तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या समर्थकांनीही त्यांच्या पैठण दौऱ्यावेळी जाहीर सभा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.
पैठण तालुक्याची धुरा ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मनोज पेरे, प्रकाश वानोळे, राजू परदेशी, राखी परदेशी यांच्यासह अनेक आजी-माजी मातब्बर नेते, निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे असल्याने त्यांनी तालुक्यातील पक्षाची पकड कायम ठेवली आहे. आगामी काळात पालकमंत्री संदीपान भुमरे यांची काय रणनीती असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.