Sambhaji nagar : सिडकोत अवघ्या तीन आठवड्यांत ६५० अतिक्रमणांवर हातोडा Sambhaji nagar Sidkot hammered 650 encroachments just three weeks | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमणांवर

Sambhaji nagar : सिडकोत अवघ्या तीन आठवड्यांत ६५० अतिक्रमणांवर हातोडा

छत्रपती संभाजीनगर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने सिडको भागात दोन मार्चपासून कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार गेल्या तीन आठवड्यात सार्वजनिक जागा, रस्ते, फुटपाथ, हरितपट्ट्यातील सुमारे ६५० अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सिडकोतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश महापालिका दिले. त्यानुसार महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभागप्रमुख रवींद्र निकम यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी दोन पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दोन पथक स्थापन करण्यात आले आहेत.

या पथकांनी २६ दिवसात सुमारे ६५० पेक्षा अधिक अतिक्रमणे हटविली. त्यात ६५ आरसीसी बांधकाम, दुकाने, गॅरेज अशा अतिक्रमणांचा समावेश आहे. तसेच ५० टपऱ्या, २१० पत्र्याचे शेड, रसवंतीगृह, शटर, जाळीचे शेड, ६५ चारचाकी व हातगाड्या, १५ संरक्षण भिंती, लोखंडी गेट, ९८ जाहिराती डिजिटल बोर्ड व पोस्टर, १३० रस्ता बाधित अतिक्रमणे, सिमेंट ओटे, झेडे काढण्यात आले.

सिडकोचे भागात एन-१ ते एन-१३ आणि टाऊनसेंटर हा खूप मोठा परिसर आहे. त्यामुळे संपूर्ण अतिक्रमणे काढण्यासाठी मोठा अवधी लागणार आहे. सिडकोच्या कारवाईमुळे जुन्या शहरातील अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी प्रलंबीत राहत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर सिडकोत तीन

दिवस व उर्वरित शहरात तीन दिवस याप्रमाणे अतिक्रमण कारवाईसाठी नियोजन करण्यात आले आहे. अतिक्रमण काढलेल्या भागात वेळोवेळी तपासणी करण्यासाठी दोन्ही पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली दोन फिरते पथक स्थापन करण्यात आले आहेत, असे श्री. निकम यांनी नमूद केले.

पोलिसांची कमतरता

पथकात पोलिसांची कमतरता आहे. पथकासोबत एक पोलिस निरीक्षक व २८ पोलिस कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पोलिस पथक मंजूर करण्यात आले आहेत. मात्र सध्या फक्त एक पोलिस निरीक्षक, दोन महिला पोलिस आणि एक पोलिस अंमलदार एवढेच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे पोलिस पथकामध्ये कर्मचारी संख्या वाढविण्याबाबत वेळोवेळी पोलिस आयुक्तांना विनंती करण्यात आली असल्याचे निकम यांनी सांगितले.

कॅनॉटमधील हॉकर्सची जागा गायब

सिडकोने कॅनॉट प्लेस भागात एक हजार मिटर जागा हॉकर्ससाठी राखीव ठेवली होती. पण ही जागा गायब होती. आता या जागेचे मार्किंग करण्यात आले आहे. परंतु, त्याठिकाणी स्थानिक नागरिकांनी पार्किंगसाठी ही जागा मिळावी, अशी विनंती केली आहे, असे रवींद्र निकम यांनी सांगितले.