
Sambhaji nagar : महिला तलाठी, कोतवाल लाचलुचपतच्या जाळ्यात
पिशोर : तीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महिला तलाठी दीपाली योगेश बागूल (वय ३२), कोतवाल शेख हारून शेख छोटू (वय ४१) यांच्यावर गुरुवारी (ता.९) लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली. आरोपी बागूल हिच्याकडे भारंबा (ता.कन्नड) येथील तलाठी पदाचा कारभार आहे तर हारून शेख हा पिशोर येथे कोतवाल आहे.
भारंबा (ता.कन्नड) येथील एका ५४ वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना (एसीबी) यांच्याकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांची भारंबा शिवारात वडिलोपार्जित जमीन आहे. तक्रारदार व त्यांचे दोन भाऊ यांच्या नावे या जमिनीचा फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी बागूल व कोतवाल हारून शेख यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे तीस हजार रुपयांची मागणी केली होती. सापळा अधिकारी एस. एस. शेख यांनी २२ फेब्रुवारी २०२३ रोजी लाच मागणी तक्रारीची पडताळणी केली होती.
यानुसार गुरुवारी (ता.९) पिशोर येथील बागूल हिच्या कार्यालयात तक्रारदार पुरुषांकडून आरोपी तलाठी बागूल व कोतवाल हारून शेख यांनी पंचासमक्ष तीस हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने या दोघांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सापळा अधिकारी एस. एस. शेख, पोलिस अंमलदार गणेश चेके, जावेद शेख, गणेश बुजाडे, गजानन कांबळे, प्रवीण खंदारे यांनी केली.