Sambhaji Nagar : लोकसभा निवडणुकीचे वारे, मंत्री कराड करत आहेत या मतदारसंघात ‘मोर्चेबांधणी’ Sambhaji Nagar Vaijapur Lok Sabha Elections Dr. Bhagwat Karad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. भागवत कराड

Sambhaji Nagar : लोकसभा निवडणुकीचे वारे, मंत्री कराड करत आहेत या मतदारसंघात ‘मोर्चेबांधणी’

वैजापूर : लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू वाहू लागले आहे. प्रत्येक पक्ष आता पुढील निवडणुकीसाठी शहरासह ग्रामीण भागात विशेषकरून संघटनात्मक बांधणीसाठी नियोजन करत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी वरिष्ठ नेत्यांनी विशेषकरून वैजापूरवर विशेष ''फोकस'' केला आहे. शुक्रवारी (ता.२) शहरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत बैठक झाली.

तालुक्यात सुरुवातीला भाजपचे काहीच अस्तित्व नव्हते, मात्र माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर नगरपालिका, ग्रामपंचायत व बाजार समितीत भाजपचा झेंडा रोवल्या गेल्याने तालुक्यात डॉ. परदेशी यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी राहिली.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव, जिल्हा अध्यक्ष विजय औताडे, जिल्हा सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी, तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, बाजार समितीच्या उपसभापती शिवकन्या पवार, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, डॉ. राजीव डोंगरे, नबी पटेल, कैलास पवार, प्रेम राजपूत, दिनेश राजपूत,

शैलेश पोंदे, सुरेश राऊत आदी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी विधानसभा, लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. यात एक हजार मतदारांच्या भेटीगाठी घेऊन ‘संपर्क से समर्थन अभियान’ राबविण्यात येणार आहे‌, अशी माहिती कराड व राज्यसभा खासदार कल्पना सैनी (उत्तराखंड) यांनीही दिली.

२० ते ३० जून या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. २२ जून रोजी प्रत्येक बूथवर योगाचा कार्यक्रम घेण्याचे नियोजन असून २३ जून रोजी शामाप्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन करण्यात येईल. २५ जून रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केल्याने हा दिवस भाजपतर्फे काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले‌.