Sambhaji Nagar: धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादात हॉटेल चालकाकडून धारदार शस्त्राने तरुणाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Sambhaji Nagar: धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादात हॉटेल चालकाकडून धारदार शस्त्राने तरुणाचा खून

सिल्लोड: जेवणाचे बिल न देण्यावरून झालेल्या बाचाबाचीनंतर हॉटेल चालक व कुकने एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शनिवारी (ता.६) सकाळी दहा वाजेच्या सुमारास सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव फाट्याजवळील घडली. याप्रकरणी हॉटेल चालक व कुकला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

संतोष बमनावत (वय २५, रा. वांजोळा ता.सिल्लोड)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हॉटेल चालक संकेत अनिल जाधव (वय २१,रा. भिमनगर, भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर, ह.मु. स्नेहनगर, सिल्लोड), हॉटेल कुक गजानन यादवराव दणके, (रा.चिंचोली नकीब ता.फुलंब्री) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहे.

सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात मृताचा भाऊ गोवर्धन बमनावत (रा.गिरिराज कॉलनी, पंढरपूर जि.छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले की, आई, वडील व लहान भाऊ वांजोळा (ता.सिल्लोड) येथे राहतात.

शनिवारी दहा वाजेच्या सुमारास त्यास चुलत भावाने फोन करून माहिती दिली की, संतोष बमनावत यास डोंगरगाव फाट्याजवळील पाटावर कुणीतरी मारहाण केली असून, त्याचा हात मोडलेला व डोळा फुटलेला आहे. माहिती मिळताच तक्रारदार यांनी सिल्लोड येथे पोहचून उपजिल्हा रूग्णालयात

त्याचा लहान भाऊ संतोष यास बघितले असता, त्याच्या शरीरावर जखमा होत्या व मृतावस्थेत दिसून आला. यामुळे मृताच्या भावाने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात धारदार शस्त्राने मारून खून केल्याची तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

दरम्यान, पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवित याप्रकरणी संशयित आरोपी हॉटेल चालक जाधव कुक दणके यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरिक्षक सीताराम मेहेत्रे करीत आहे.

वाढदिवस ठरला अखेरचा

मृत संतोष याचा शुक्रवार (ता.५) वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तो काही मित्रांसमवेत डोंगरगाव फाट्यालगतच्या एका हॉटेलवर जेवण्यासाठी गेला होता. जेवणानंतर हॉटेल चालक व कुक यांच्यात जेवणाच्या बिलावरून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर खूनामध्ये झाल्याने संतोष याचा तो वाढदिवस अखेरचा ठरला.

टॅग्स :crime