Sant Eknath Maharaj : शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा ४२३ वा नाथषष्ठी उत्सव

सार्वकालिक विवेकी विचारांच्या जाणीवा मानवी विचारातून प्रवाही होतांना प्रचंड सकारात्मकता समाज
Sant Eknath Maharaj
Sant Eknath Maharaj sakal

मानवाच्या सर्वंकष कल्याणाचा, उत्थानाचा आणि ऊर्ध्वगामी उर्जेचा जेंव्हा जेंव्हा विचार होतो तेंव्हा अनेक महामानवांचे जीवन आणि कार्य जगास नित्य पथागामी झाले आहे. उच्च कोटीचा मानवतावाद प्रतिबिंबित करून बुद्धीप्रामाण्यवादातून पराकोटीची मानवता जपण्याचे जिथे-ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले त्यांचीच इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी नोंद झालेली आढळून येते.

सार्वकालिक विवेकी विचारांच्या जाणीवा मानवी विचारातून प्रवाही होतांना प्रचंड सकारात्मकता समाज मनातून प्रवाही होते आणि मग सुरु होतो नव्या विचारांचा दैदिप्यमान आनंद सोहळा! या सोहळ्यात अगदी प्राचीन काळापासून ते आजतागायत अनेक विभूतींनी आपल्या वैश्विक विचारांची आहुती देऊन आपापल्यापरीने समाजऋण आणि राष्ट्रऋण फेडण्याचे महत्कार्य केलेले आढळून येते.

देश-मानवधर्म-लोकोद्धारासाठी अनेक महान नरवीर देशभक्तांनी रक्त सांडले, प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्याचबरोबर अनेक समाजसुधारक, संत, विचारवंतांनी लोकोद्धारासाठी आपले अनमोल जीवन खर्ची घातले. यामध्ये महाराष्ट्रातील वारकरी संतांचे योगदान अनन्यसाधारण असून त्यात संत नामदेव, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम या चार संतांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

यातील प्रमुख संतांपैकी एक असणारे संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराजांचा वैकुंठगमन म्हणजेच जलसमाधी दिन आज फाल्गुन वद्य षष्टी या तिथीला श्री एकनाथषष्टी म्हणून साजरा केला जातो. संत बहिणाबाई आपल्या एका अभंगातून वारकरी संप्रदायाचा संक्षिप्त इतिहास कथन करतांना लिहितात "जनार्दन एकनाथ। खांब दिधला भागवत " या अभंगाचे अवलोकन केले असता संत एकनाथ महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचा मजबुत खांब आहेत.

संत नामदेव-संत ज्ञानदेव या संतद्वयानंतर अडीचशे वर्षांनी संत एकनाथांनी वारकरी संप्रदायांस पुन्हा झळाळी प्राप्त करून दिली. सोळाव्या शतकांत जन्मलेले संत एकनाथ मोठे भाग्यवान संत. आत्मसन्मान राखून त्यांनी आपल्या विचारांचा प्रसार-प्रचार केला. संत एकनाथ हे एकमेव वारकरी संत आहेत जे संत-पंत-तंत या तीनही बिरुदावलीने सर्वश्रुत आहेत. लहानपणीच आई-वडील कालवश झाल्यामुळे त्यांचा सांभाळ आजी-आजोबांनी केला.

परंपरेने आलेली पंढरीची वारी आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, परिणामी त्यांच्यावर मूलगामी वारकरी संस्कार झाले. वयाच्या बाराव्या वर्षी देवगिरी येथील नाथ सांप्रदायिक श्रीगुरू जनार्दन स्वामीच्या सानिध्यात आले. कमी वयातच गुरुकडून नाथ सांप्रदायाच्या संस्काराबरोबरच वारकरी संस्कार होऊ लागले.

लहान वयातच गायन आणि विविध धर्मग्रंथ अध्ययन-अध्यापन-पाठांतराची सवय जडली. यातूनच युवा एकनाथ भजन-कीर्तन करायला लागले. कडक शिस्त, श्रीगुरूंचा प्रभाव असल्याकारणाने महाराज सुद्धा शिस्तीत वागायला शिकले. गुरूंच्या आज्ञेवरून एकनाथ गृहस्थी झाले. गुरुची ज्ञान-धनाची श्रीमंती एकनाथांच्या संसारात आणि परमार्थात ओसंडून वाहू लागली. "नाचू कीर्तनाचे रंगी" उक्तीप्रमाणे एकनाथांना भेदाभेद मान्य नव्हते.

एकनाथ महाराजांना वर्णव्यवस्था मान्य नव्हती. त्यांच्यावर पक्के वारकरी संस्कार रुजले होते. गोदावरी तटावर वसलेल्या पैठण गावात राहून एकनाथ महाराज आपला संसार आणि परमार्थ मोठ्या सन्मानाने करत होते. तहानेने व्याकूळ गाढवाला पाणी पाजणे, अनवाणी पायाने वाळवंटातील हरीजनाचे मूल उचलून कडेवर घेणे आणि शंभरवेळा यवन अंगावर थुंकूनसुद्धा एकनाथ महाराज क्रोधिष्ट झाले नाहीत. यामुळेच संत एकनाथ शांतीब्रह्म म्हणून ओळखले जाऊ लागले.

संत एकनाथांनी लोकप्रबोधन करतांना स्वतःही लिहायला प्रारंभ केला. चिंतन-मनन करून अनेक महत्वपूर्ण ग्रंथ संत एकनाथांनी लिहिले. त्यातील श्री एकनाथी भागवत हा वारकरी सांप्रदायातील अग्रगण्य ग्रंथांपैकी एक मानला जातो. यात मराठी भाषेचा कैवार घेत नाथांनी "संस्कॄत वाणी देवे केली । तरी प्राकॄत काय चोरापासुनि झाली?"असा खडा सवाल करून तेथील धर्म मार्तंडांना आपल्या भक्‍तिज्ञानाने प्रभावित केले.

 त्याशिवाय विविधप्रकारचे वाङ्मय लिहून आपला ठसा जसे भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, अभंग गाथा, चतुःश्लोकी भागवत, शुकाष्टक, हस्तामलक, स्वात्मसुख, आनंदलहरी, चिरंजीवपद, हरिपाठ, बिरुदावली, भारुड, गवळणी इत्यादी वैविध्याने नटलेले वाङ्मय नाथांनी लिहून मराठी साहित्यास भरीव योगदान दिले आहे.

Sant Eknath Maharaj
Rocky Aur Rani ki Prem Kahani च्या सेटवरील आलिया भट्टचा हा व्हिडिओ व्हायरल, या लूकमध्ये दिसणार अभिनेत्री

संत एकनाथांचे वाङ्मय सहजतेने लोकांना रुचणारे-पचणारे असून लोकभाषेतून लोकप्रबोधन करण्याचे महान कार्य नाथांनी सोळाव्या शतकात केले. नाथांच्या लेखनाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची भारुडे जी जीवन, राजकारण आणि कुटुंबातील दैनंदिन कैफियत लोकांसमोर येते. संसार, फुगडी, लग्न, होळी, गोंधळ, अभयपत्र, विनंतीपत्र, ताकीदपत्र, जाबचिट्ठी, वासूदेव, आंधळा, पांगळा, मुका, बहिरा, भुत्या, संन्यासी, जोशी, जोहार, दरवेश, गारुडी, फकीर, जोगी, विंचू, वटवाघुळ, एडका, पिंगळा आदि भारुडं हि एक वाच्यार्थ तर एक गुढार्थ आहे.

त्याशिवाय संत एकनाथांच्या गवळणी खूपच आकर्षक आहेत. विशेषतः एकनाथांचा हरिपाठ रोखठोक असून "काय माय गेली होती भूतापाशी" सारख्या झणझणीत ओळी लिहून नाथ महाराज अभक्तांची कानउघडणी करतात.

Sant Eknath Maharaj
GST Department Pune : ७० कोटींची बनावट बिल्स सादर केलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

आज शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा ४२३ वा नाथषष्ठी उत्सव साजरा करतांना आपण सार्वांनीच संत एकनाथांनी घालून दिलेल्या वारकरी परंपरांची जपणूक करण्याची वेळ आली आहे. संत एकनाथ महाराजांचा

सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी । संज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी ।।

संतसंगे अंतरंगे नाम बोलावे । कीर्तनरंगी देवा सन्निध सुखें डोलावे ।।

भक्तीज्ञाना विरहीत गोष्टी इतरा न कराव्या । प्रेमभरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या ।।

जेणे करूनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची । ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची ।।

या अभंगाप्रमाणे आज कीर्तन होणे काळाची गरज बनली आहे. आज कीर्तनाचा झालेला व्यापार थांबून निखळ निकं तत्व-कीर्तन करणाऱ्या उच्च शिक्षित लोकांची वारकरी संप्रदायांस नितांत गरज आहे. आज कीर्तन केवळ हसण्यासाठी, मनोरंजनासाठी झालेले पाहून ज्ञानदेव-नामदेव-एकनाथ-तुकाराम संतांची मेहनत वाया जात आहे की काय?

असा प्रश्न मनाला सतावून जात आहे. वेगवेगळे "चार्य" कीर्तनक्षेत्रात उदयाला येत असून चोखंदळ-अज्ञानी साप्ताह आयोजक लोकांकडून लाखोंच्या पट्ट्या जमा करून "हा हा ही ही" चे कार्यक्रम घडवून आणत आहेत. हे कुठंतरी थांबायला हवे. कीर्तनकारांनी व्यापार कमी करून खरे कीर्तन करून संतांची परंपरा इमानदारीने जपण्याचा प्रयत्न करावा. शिवाय काही बोटांवर मोजण्याएवढी मंडळी सोडली तर; आज एकही कीर्तनकार महाराज कविता, अभंग किंवा एखाद्या वारकरी ग्रंथांवर टीका-समीक्षण लिहित नाहीत.

सगळे पोपट झालेत. कुणीच लिहित नाही. हे ही बदलले पाहिजे. अनेक विद्वजणांनी विविध धर्म ग्रंथावर सार्थ चिंतन लिहून सांप्रतकाळी लोकजागृती घडवून आणायला हवी. असे झाल्यास खऱ्या अर्थाने संतांच्या बीज-षष्ठीचा सोहळा साजरे करणे होय अन्यथा तो केवळ एक सोहळाच राहील, त्यातून नवे काहींच निष्पन्न होणार नाही.

तेंव्हा मायबाप सज्जनहो, आज वाचन-लेखन-प्रसार-छपाई इत्यादी सर्व सुविधा पायांवर लोळण घेत असतांना जास्तीत जास्त उच्च शिक्षित लोकांनी अनेक संतांच्या वाङ्मयावर लिहून वर्तमानात संतांचे लेखन कसे मार्गदर्शक, उपयोगी आहे(?) हे सांगावे लागेल.

असे झाले म्हणजे सर्वच संतांच्या ग्रंथांना लोक पुन्हा वाचायला लागतील आणि समाजात एकोपा, सलोखा, सहिष्णुता, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा इत्यादी मुल्ये रुजायला लागतील! तेंव्हाच खऱ्या अर्थाने नाथषष्ठी संपन्न झाली असे शांतीब्रह्म एकनाथांना वाटेल! ते मनोमन सुखावतील यात तिळमात्र शंका नाही! भानुदास-एकनाथ!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com