Sushma Andhare : सत्तासूत्रे भाजपच्याच हाती; सुषमा अंधारे यांची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare

Sushma Andhare : सत्तासूत्रे भाजपच्याच हाती; सुषमा अंधारे यांची टीका

पैठण : राज्यातील सर्व सत्तासूत्रे भाजपच्याच हाती असून मुख्यमंत्र्यांसह आमदारांना मिळालेली मंत्रिपदे नावापुरती आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे सरकारची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाल्याची खरमरीत टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी (ता.१८) केली. पैठण येथे महाप्रबोधन यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मराठवाडा संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख राठोड, प्रकाश वानोळे, जिल्हा संघटक राखी परदेशी, स्वाती माने यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुकाप्रमुख मनोज पेरे यांनी प्रास्ताविक केले.

श्रीमती अंधारे म्हणाल्या, ‘‘माझ्या एका एका भावाची विचारपूस करत करत आज पैठणला माझ्या भावाचं काय चाललंय ते बघायला आले आहे. भावाला सुखी राहू दे, राज्य मिळू दे अन् मंत्रिपदही मिळू दे, असे साकडे मी घातले आहे. परंतु, आज मंत्रिपद मिळूनही माझ्या भावाला किंमत नसल्याचे माझ्या लक्षात आले आहे. त्यामुळे या भावाचे औक्षण आता मी केले आहे!’’ भाजपने शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले.

तरीही आम्ही सरकार पाडले नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगत आहेत. जे काही केले ते तुमच्या शिवसेनेच्या लोकांनी केल्याचे फडणवीस सांगत असले तरी सरकार पाडण्याच्या षड्‍यंत्रात तेच प्रमुख सूत्रधार आहेत, असा आरोप त्यांनी केला. भाजपचे नेते शिवसेना संपविण्याची भाषा एकनाथ शिंदे व ४० आमदारांसमोर करीत असताना शिंदे हे भाजपचे गुणगाण गात आहेत.

यावरुन शिवसेना, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता वाचविण्यासाठी त्यांची काय आणि किती धडपड आहे, हे स्पष्ट होते. आम्ही मराठा मुख्यमंत्री केला, पण त्याला बोलता येत नाही, कामे करता येत नाहीत, ही बाब भाजपकडून सातत्याने ठासून सांगितली जात आहे. एवढे सगळे घडत असूनही एकनाथ शिंदे गप्प का, असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला.

पैठणच्या विकासात उद्धव ठाकरे यांचा सिंहाचा वाटा

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी पैठणच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला. परंतु, हा निधी एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचे मंत्री भुमरे हे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत. संत ज्ञानेश्वर उद्यान व तीर्थक्षेत्र विकासासाठीचे एकही काम श्री. भुमरे यांनी केले नसल्यामुळे या तीर्थक्षेत्राची वाट लागली. पैठणला जे काही मिळाले त्यात उद्धव ठाकरे यांचा सिंहाचा वाटा असून जनतेला हे माहीत आहे, असेही अंधारे यांनी यावेळी नमूद केले.