Chhatrapati Sambhajinagar : ‘आय लव्ह छत्रपती संभाजीनगर’ची मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray distribution of postcards in Chhatrapati Sambhajinagar Kishanchand Tanwani politics

Chhatrapati Sambhajinagar : ‘आय लव्ह छत्रपती संभाजीनगर’ची मोहीम

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ पोस्ट कार्ड वाटप आणि छत्रपती संभाजीनगर नामकरणाला गुलमंडी येथून सुरूवात करण्यात आली.

गुलमंडीवरील प्रत्येक दुकानामध्ये जाऊन शिवसैनिकांनी ‘छत्रपती संभाजीनगर’चा फलक लावला. त्यासोबत छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ दहा हजार पोस्ट कार्ड पाठविण्यास सुरुवात करण्यात आली.

विभागीय आयुक्त यांच्या नावाने हे पोस्टकार्ड पाठवले जाणार आहेत. याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, मध्य विभागाचे शहर संघटक गोपाळ कुलकर्णी, युवा सेना शहर युवा अधिकारी आदित्य दहीवाल ,

उपशहरप्रमुख सुगंधकुमार गडवे, बंटी जैस्वाल, प्रविण कडपे, अजय चावरिया, सुधीर नाईक, राजू खरे, योगेश अष्टेकर, धन्नू गोरक्षक, छोटू घाडगे, फिरोज कुरेशी, सय्यद मुस्ताक, मुजाहेद खान, अब्दुल करीम यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

त्यांनी मित्राची समजून काढावी : तनवाणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजीनगर हे आवडते शहर होते. १९८८ साली शिवसेनाप्रमुखांनी सर्वप्रथम शहराचे संभाजीनगर नामकरण केले. ३५ वर्षापासून हे शहर संभाजीनगर नावाने ओळखले जाते.

छत्रपती संभाजीनगर नामकरणास विरोध करीत एमआयएमचे खासदार जलील यांनी आंदोलन सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्राची समजून काढावी, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी दिली.

त्यांचे विरोधाचे आंदोलन नौटंकी : फिरोज कुरेशी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर हे नामकरण केले आहे. मुस्लीमांनीही या नावाला कधी विरोध केला नाही. मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करीत सुरू केलेले आंदोलन हे तर नौटंकी आहे. बेरोजगार मुस्लीम तरुणांना हाताशी धरुन त्यांच्या भावनाशी खेळ केला जात आहे.

समाज-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. हजारो मुस्लीमांचे नामांतराला समर्थन आहे. खासदार जलील यांना औरंगाबाद नावाचा एवढा कळवळा असेल तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असा टोला फिरोज कुरेशी यांनी प्रतिक्रिया देताना लगावला.

टॅग्स :Shiv SenaUddhav Thackeray