शिवसेना पुन्हा उभी राहील

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा दावा
Chandrakant Khaire
Chandrakant Khaire Team eSakal

औरंगाबाद - आमदारांना मी गद्दार म्हणणार नाही तर ते बंडखोर आहेत. ते परत येतील या अपेक्षेने शिवसैनिक शांत आहेत. जरी शांत असले तरी अस्वस्थ आणि संतप्त आहेत. शिवसैनिक आक्रमक आहेत हे दिसून येईल. शिवसेना कधीच संपत नाही ती अभेद्य असून शिवसेना पुन्हा एकदा ताकदीने उभी राहील, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडाच्या पार्श्‍वभूमीवर खैरे रविवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या वाटचालीचा व बंडखोर मंत्री, आमदार पूर्वी काय होते, त्यांना शिवसेनेने आतापर्यंत काय दिले याचा ऊहापोह केला. शिवसेना म्हणजेच संघर्ष, त्यामुळे अशी संकटे नवीन नाहीत. या बंडखोरांच्या छाताडावर पुन्हा मजबुतीने भगवा फडकावला जाईल. जिल्ह्यातील जनता शिवसेनेला मानणारी व शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी प्रेरित झाली आहे. त्यामुळे हा जिल्हा बालेकिल्ला होता आणि राहणार असा ठाम विश्‍वासही खैरे यांनी व्यक्त केला.

सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या निधी हा मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनेच दिला गेला. मात्र, प्रकृती अस्वास्‍थ्यामुळे ते समोर आले नाहीत. याचाच काहींनी गैरफायदा घेतला. त्यामुळे निधी हा सामान्य जनतेच्या करातून जमा होतो. त्यांचा फायदा जनतेसाठी करावा, बंडखोरांच्या विकासासाठी नको, असा सल्ला त्यांनी बंडखोरांना दिला.

दुसऱ्यांदा गद्दारी करायला नको होती

खैरे म्हणाले, की आमदार संजय शिरसाट यांनी १९९१ मध्येही दोन वर्षे गद्दारी केली होती. त्यावेळी त्यांना बाळासाहेबांनी माफ केले होते. त्यामुळे आता दुसऱ्यांदा गद्दारी करायला नको होती. प्रदीप जयस्वाल यांच्या संदर्भात म्हणाले, त्यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाने बंड करायला नको होते. तसेच सत्तेच्या हव्यासापोटी राज्यात अराजकतेचे वातावरण निर्माण करू नये, असा इशारा देत महाविकास आघाडीचे सरकार टिकणार असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

मग मी तोडफोड करू का?

शिवसेना शांत कशी, या प्रश्‍नावर खैरे यांनी, या बंडखोरीने सर्वात जास्त दुःख झाले आहे, म्हणून काय मी तोडफोड करू का, असा सवाल केला. मी शिवसेना नेता आहे, बाकीचे नेते, पदाधिकारी मग कशाला आहेत असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. तर जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी शिवसेना आक्रमकच आहे. राज्यात आंदोलनाची सुरूवात औरंगाबादमधूनच झाली आहे, असे ठणकावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com