Aurangabad : दिवाळी तोंडावर रेशनची ‘किट किट’

लाभार्थींचा सण गोड कसा होणार : सिल्लोडमध्ये आनंद शिधा किटची प्रतीक्षा
Aurangabad Ration Card Holder
Aurangabad Ration Card Holder

सिल्लोड : सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारने शंभर रुपयांमध्ये दीपावली आनंद शिधा (किट) देण्याची घोषणा केली खरी. परंतु अद्यापही या किटचा पुरवठा सिल्लोड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी गोड कशी होणार असा सवाल लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे. एकूण हा प्रकार वरातीमागून घोडे मिरविण्या सारखा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शिंदे, फडणवीस सरकारने शंभर रुपयांमध्ये दीपावली आनंद शिधा (किट) देण्याची घोषणा केली. मात्र, अद्यापही या किटचा पुरवठा न झाल्यामुळे लाभार्थ्यांनी सरकारच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. सणासुदीच्या काळात तरी घोषणा केल्यानंतर धान्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे.

स्वस्त धान्याचे वितरण काही ना काही कारणांमुळे कायम वादामध्येच राहत, असल्याने नियमित दरमहा वाटप करण्यात येणारे धान्याचाही अवेळीच पुरवठा होत असल्याचे चित्र आहे. या महिन्यात नियमित वाटप करण्याचे धान्य महिन्याच्या सुरूवातीस पुरवठा करणे गरजेचे होते. परंतु पंधरा दिवसानंतर काही दुकानांनाच नियमित धान्याच्या नियतनाचे वाटप झाले.

त्यातही महत्त्वाचे म्हणजे धान्याचे व किटचे वाटप सोबतच मशिनमध्ये थंब देऊन करण्याची अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे आता नियमित धान्य घेण्यास येणारा लाभार्थी केवळ नियमित धान्य घेऊनच माघारी फिरणार आहे. कारण दीपावली आनंद किटचा पुरवठाच झाला नसल्याने दुकानदारांसमोर देखिल आता हे धान्य दिल्यानंतर पुन्हा मशीनमधून किटचे वाटप कसे करावे असा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पुरवठा विभागास काही दिवसांपूर्वी निवेदन देखिल देण्यात आले आहे. मात्र, त्याची दखल न घेतल्याचे चित्र आहे.

तालुक्यात ५८ हजार किटची गरज

-तालुक्यात शेतकरी, अंत्योदय व प्राधान्य कुटुंब धारक असे एकूण सुमारे ५८ हजार लाभार्थी आहेत. यामध्ये शेतकरी कार्डधारक ४२ हजार ४५४, अंत्योदय योजनेतील ४५८४ तसेच प्राध्यान्य कूटूंबधारक १०५१९ लाभार्थ्यांना या किटचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यास सुमारे ५८ हजार किटची आवश्यकता भासणार आहे. मात्र, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीआधी किट येण्याची शक्यता नसल्याने लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार नसल्याचे चित्र आहे.

तालुक्यात दीपावली आनंद शिधा (किटचा) अद्यापही पुरवठा झालेला नाही. वेळेत पुरवठा होत नसून, दिवाळी तोंडावर आली आहे. लाभार्थी किटची मागणी करू लागले असून, पुरवठा वेळेत न झाल्यास वाटपामध्ये देखिल अडचणी येणार आहे. त्यामुळे वाटप मागेपुढे झाल्यास त्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार जबाबदार राहणार नाही.

-रफिक शेरखान, अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार संघटना, सिल्लोड तालुका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com