Aurangabad : एसटी बंदचा फटका; परीक्षार्थी वेळेत न पोचल्याने परीक्षेला मुकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी बंदचा फटका; परीक्षार्थी वेळेत न पोचल्याने परीक्षेला मुकले

एसटी बंदचा फटका; परीक्षार्थी वेळेत न पोचल्याने परीक्षेला मुकले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : रविवारी (ता.२१) जिल्ह्यातील ५४ केंद्रावर दोन सत्रात भावी शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही पेपरसाठी एकूण २२ हजार ९०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. दरम्यान, एसटी बंदचा फटका परिक्षार्थ्यांना बसला असून वेळेत न पोहचल्याने अनेकांना या महत्त्वाच्या परीक्षेला मुकावे लागल्याचे दिसून आले.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

रविवारी (ता.२१) सकाळच्या सत्रात ४३ केंद्रांवर टीईटी पेपर १ घेण्यात आला. या परीक्षेला १३ हजार १९९ पैकी ११ हजार ४६६ विद्यार्थी उपस्थित राहीले, तर १ हजार ७३३ विद्यार्थी गैरहजर होते. दुपारच्या सत्रात ३१ केंद्रांवर टीईटी पेपर २ घेण्यात आला. यासाठी ९ हजार ७०५ पैकी ८ हजार ४९० विद्यार्थी उपस्थित; तर १ हजार २१५ विद्यार्थी अनुपस्थित राहीले. पेपरसाठी एक तास अगोदर विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आदेश होते. मात्र, एसटी बंदसह इतर काही अडचणीमुळे वेळेत पोहचू न शकल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. शहरातील अनेक केंद्रावर साधारणतः अशीच परिस्थिती होती.

एसटी बंद असल्यामुळे टीईटी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना पोहोचताना मोठा त्रास सहन करावा लागला. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला. तोपर्यंत केंद्राचे प्रवेशद्वार बंद झाले होते. गेट बंद असल्याने परीक्षार्थी पोलिसांना विनवणी करत होते. मात्र, नियमांची आडकाठी असल्यामुळे केंद्रावरील कर्मचारी देखील हतबल झालेले दिसले. परीक्षा देण्यासाठी अडवल्याने अनेक काही विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा: टीम इंडियाकडून ब्लॅक कॅप्सला व्हाइट वॉश!

आत पत्नीची; बाहेर पतीची परीक्षा

एसटी बंदमुळे काही परीक्षार्थींनी वेळेत परीक्षा देता यावी, म्हणून चिमुकल्यांसह परीक्षा केंद्र आवारात झोका बांधून रात्रीचा मुक्काम केला. यावेळी महिला परीक्षार्थ्यांसोबत त्याचे पती हजर होते. महिला परीक्षार्थी पेपर देण्यासाठी हॉलमध्ये गेल्यानंतर चिमुकल्यांना सांभाळण्याची जबाबदारी पतीवर आली होती. त्यामुळे महिला परीक्षार्थी केंद्रावर टीईटी परीक्षा देत असताना, बाहेर तीन तास चिमुकल्यांना सांभाळताना पित्याची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले.

"काही केंद्रावरुन उशिरा आलेल्या परीक्षार्थींचे फोन आले होते. पंरतू, विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटावर परीक्षा वेळेबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. सूचनेनुसार कार्यवाही झालेली आहे."

- डॉ. बी. बी. चव्हाण,

शिक्षणाधिकारी तथा सदस्य सचिव परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती

"वैजापूर तालुक्यात आमचे गाव आहे. परीक्षा असल्याने मी सकाळी सहा वाजता पेपरसाठी घराबाहेर पडलो होतो. बाहेर पडल्यानंतर अनेक वाहनांमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने खासगी वाहन वेळेत न मिळाल्यामुळे दहा वाजता औरंगाबादला पोचलो. मात्र, त्यानंतर परीक्षाकेंद्रावर पोहोचलो असता तोपर्यंत वेळ निघून गेली होती. खासगी वाहनांनी देखील अडवणूक करीत अतिरिक्त भाडे घेतले. तरीही वेळेत पोहचू शकलो नाही."

- नवनाथ खरात, परीक्षार्थी

"एसटी बंदमुळे आमची गावाकडून परीक्षेला येण्याची गैरसोय झाली. आम्हाला परीक्षेला बसू द्या, आमचे नुकसान करु नका, अशी विनंती पोलिसांकडे केली मात्र, काहीच उपयोग झाला नाही. आमच्यासाठी पुन्हा टीईटी परीक्षेचे आयोजन करावे."

- संजय नवले, परीक्षार्थी

loading image
go to top