अर्ध्यावर सोडली पटोलेंनी पदयात्रा

काँग्रेसची गटबाजी, कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह
State President of Congress Nana Patole abandoned Gaurav of Azadi Padyatra in Aurangabad city
State President of Congress Nana Patole abandoned Gaurav of Azadi Padyatra in Aurangabad city

औरंगाबाद - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहरात काढण्यात आलेली ‘आझादीचा गौरव’ पदयात्रा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी (ता. ११) अर्ध्यावर सोडली. कार्यकर्ते पुढे अन् पटोले मागे असे चित्र फेरीत काही काळ होते. त्यामुळे सिटी चौकातून पटोले यांनी फेरीतून काढता पाय घेतला. त्यानंतर शहराध्यक्ष युसूफ शेख यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकापर्यंत फेरी काढण्यात आली.

काँग्रेसतर्फे शहागंज येथील गांधी पुतळा ते क्रांती चौकापर्यंत फेरीचे आयोजन केले होते. सकाळी ९.३० वाजता पदयात्रेची वेळ होती. पण पटोले दुपारी दीड वाजता शहागंजमध्ये आले. विशेष म्हणजे, ते शहरातच मुक्कामी होते. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पटोलेंच्या नेतृत्वाखाली फेरीला सुरवात झाली. यावेळी कॉंग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश उपाध्यक्षा सरोज मसलगे, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे, शहराध्यक्ष युसूफ शेख, जितेंद्र देहाडे, इब्राहिम पठाण, ॲड. सय्यद अक्रम, डॉ. पवन डोंगरे, डॉ. जफर खान, युसूफ मोकाती, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष हेमा पाटील, शहराध्यक्ष अंजली वडजे, एकबालसिंग गिल यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पदयात्रेत तिरंगा व काँग्रेसचे झेंडे घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते.

फेरीला सुरवात होताच कार्यकर्त्यांनी श्री. पटोले यांना गराडा घातला. पटोले मागे व कार्यकर्ते पुढे असे चित्र होते. त्यामुळे पटोले यांनी संताप व्यक्त करत शिस्तीत फेरी काढण्याचे आवाहन केले. त्यानंतर पटोले हातात तिरंगा झेंडा घेऊन पुढे निघाले. मात्र ते सिटी चौकात येताच झेंडा शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्या हातात देऊन निघून गेले. ग्रामीण भागात जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी पदयात्रेचे आयोजन केले होते. भालगाव येथे पदयात्रेत नाना पटोले गेल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यकर्ते ताटकळले

पदयात्रेची वेळ सकाळी ९.३० ची होती. त्यानुसार सकाळी ९ वाजेपासून कार्यकर्ते, पदाधिकारी गांधी पुतळ्याजवळ जमा होत होते. सुरवातीला तासाभरात पटोले यांचे आगमन होईल, असे सांगण्यात आले पण तब्बल चार तास उशिराने पटोले आले. त्यामुळे पदयात्रेसाठी आलेल्या महिला, विद्यार्थी, युवती उभ्या राहून कंटाळल्या. अनेकांनी गांधी पुतळ्याखाली ठिय्या मांडला. काही महिलांनी आम्हाला दोन तासांचा वेळ सांगण्यात आला होता पण चार तास उलटले तरी पदयात्रा सुरू झाली नाही, अशा भावना व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com