औरंगाबादेत पोलिसांचा आज खडा पहारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

औरंगाबादेत पोलिसांचा आज खडा पहारा

औरंगाबाद - शहरातील २४ मशिदींजवळ पोलिसांचा बुधवारी (ता.४) खडा पहारा असणार आहे. यासाठी तीन पोलिस उपायुक्त, तीन सहायक आयुक्त, ३९ निरीक्षक, २८ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, १५४ शस्त्रधारी आणि १२४८ पोलिस कर्मचारी असा एकूण १६०५ पोलिसांचा ताफा तैनात असेल. पोलिस आयुक्तालयातर्फे आज ही माहिती देण्यात आली. ‘मनसे’तर्फे हनुमान चालिसा लावण्याच्या शक्यतेने ही खबरदारी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. शहरात जवळपास एक हजार ४८ मंदिरे तर सुमारे ४२० मशिदींची संख्या असल्याची माहिती पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेकडून देण्यात आली. यातील ४० ते ४५ ठिकाणी मंदिरे आणि मशिदी जवळजवळ आहेत. अशा संमिश्र लोकवस्तीच्या ठिकाणी गस्त घालून बंदोबस्तही वाढवण्यात येणार आहे. बंदोबस्ताचे काही ठिकाणेही निश्चित झाली असून संवेदनशील, अति संवेदनशील मशिदी असे पोलिस दलातर्फे वर्गीकरण करण्यात आले आहे. शहरातील १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पीटर मोबाइल, सेकंड, थर्ड, बीट मार्शल, ११२ पीसीआरद्वारे संवेदनशील परिसरात २४ तास पेट्रोलिंग होणार आहे. याव्यतिरिक्त गुन्हे शाखा, सायबरसेल, कमांड, कंट्रोल सेंटरद्वारे समाजकंटक, गुंडांसह शहरातील हालचालींवर विशेष लक्ष ठेवणार आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी पथकेही तैनात असतील.

पदाधिकाऱ्यांना पाचारण

‘मनसे’च्या कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसा पठण केले जाण्याची शक्यता ओळखून बंदोबस्त लावला जाणार असून मनसैनिकांना नोटिसाही बजावण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त (विशेष शाखा) बालाजी सोनटक्के यांनी दिली. ‘मनसे’च्या जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांना १४९ ची नोटीस देण्यात आली आहे. सकाळपासूनच पदाधिकाऱ्यांना स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये बोलावले जाते होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या घराजवळ सकाळपासूनच पोलिस होते. नंतर उस्मानपुरा ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी त्यांना नोटीस बजावली. मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच सतनाम सिंग गुलाटी, वैभव मिटकर, दिलीप बनकर, बिपीन नाईक, गजगौडा पाटील, आशिष सुरडकर, मंगेश साळवे, राहुल पाटील, संकेत शेटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

शांतता टिकविण्यासाठी सहकार्य करा

शहर परिसरातील शांतता, सुव्यवस्था अबाधित, टिकवून ठेवण्यासाठी पोलिस दल सज्ज असून त्यासाठी २४ तास खडा पहारा देणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तालयातर्फे देण्यात आली. नागरिकांनीही सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.

Web Title: Strict Watch Aurangabad Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top