Chhatrapati Sambhajinagar : विकासाला गती देवून गतीमान असल्याचे दाखवावे; सुभाष देसाई यांचा सरकारला टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Subhash Desai

Chhatrapati Sambhajinagar : विकासाला गती देवून गतीमान असल्याचे दाखवावे; सुभाष देसाई यांचा सरकारला टोला

छत्रपती संभाजीनगर : आपले शहर आदर्श शहर व्हावे यासाठी प्रत्येकांनी जबाबदारी घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शहर विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या योजना रखडल्या आहेत त्यांना गती देण्याचा आम्ही अग्रह धरत आहोत.

शहराची गरज लक्षात घेवून शहराच्या विकासाला गती देवून आपण ‘ गतीमान ' आहोत हे दाखवून द्यावे असा टोला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते , माजी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कोणाचे नाव न घेता राज्यातील सरकारला लगावला.

महाविकास आघाडीच्या राज्यभरात संयुक्त सभा होणार आहेत. त्याची सुरूवात रविवारी ( ता.दोन ) छत्रपती संभाजीनगरातुन होत आहे. या सभेच्या पुर्वतयारीची पाहणी करण्यासाठी श्री. देसाई शनिवारी ( ता.एक) इथे आले होते, यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

दोन दिवसांपुर्वी शहरात झालेल्या तणावपुर्ण परिस्थितीच्या पार्श्‍वभुमीवर ही सभा होत असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, रविवारची सभा वातावरण भडकावणारी नव्हे तर दोन दिवसांपुर्वी झालेली घटना दुर्दैवी असून तसे शहराला पुन्हा गालबोट लागू नये असे आवाहन करणारी असेल.

कोणत्याही निवडणूका आल्या तरी महाविकास आघाडी त्याला सामोरे जाऊन जिंकून दाखवेल, असा विश्वास जनतेला या सभेतून दिला जाणार आहे. सर्व समाजघटक महाविकास आघाडीसोबत येत आहेत, ते येणे ही आघाडीची भुमिका आहे.

तणाव निर्णाण करणाऱ्या घटना कोणत्याही शहरात घडू नयेत. शहर सुरक्षित आणि शांत रहावे हीच आघाडीची भुमिका आहे. शहरांतील चांगले वातावरण औद्योगिक गुंतवणुकींसाठी पोषक असते असे मत व्यक्त केले.

यापुर्वी मी जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात शहरासाठी पाणीपुरवठा योजना, शिवसेनाप्रमुखांचे स्मारक, रस्ते अशी नविन कामे सुरू केली होती. मात्र त्यांची गती सद्या मंदावल्याचे कळते याना गती देण्यासाठी आम्ही आग्रह धरणार आहोत.

या कामांना गती देण्याची गरज आहे. २८ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटल्याच्या संदर्भात विचारले असता त्यांनी संपर्कात असलेल्यांची नावे आम्ही फोडू इच्छित नसल्याचे सांगुन प्रश्‍नाला बगल दिली.

मीच कारण शोधतोय

श्री. देसाई यांचा मुलगा शिंदे गटात गेल्याबद्दल विचारले असता सुभाष देसाई म्हणाले, माझा मुलगा शिंदे गटात गेला ही दुर्दैवी घटना आहे. तो का गेला याचा मीच अंदाज आहे की तो का गेला असे सांगुन तुम्ही त्याला पाठवल्याचे बोलले जाते असे पत्रकारांनी विचारल्यानंतर त्याचा त्या स्पष्ट शब्दात इन्कार केला.

टॅग्स :political