esakal | Success Story: गोमूत्र, शेणावर २५ एकरांत बहरतेय फळबाग
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad

Success Story: गोमूत्र, शेणावर २५ एकरांत बहरतेय फळबाग

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद: शेतीचे उत्पादन वाढावे म्हणून अनेकजण महागडी रासायनिक खते वापरतात. मात्र देशी गोवंश संवर्धनामुळे सुलतानपूर (खुलताबाद) शिवारात २५ एकरांत केशर आंबा, सीताफळ, पेरूची फळबाग बहरतेय. या फळबागेत रासायनिक खताचा एक थेंबदेखील टाकलेला नाही. केवळ गायींच्या शेणाचा वापर करून बायोगॅसमधून निघणारी स्लरी, गांडूळखत, गोमूत्र, शेण-गोमूत्र व अन्य घटकांपासून बनवलेल्या जीवामृताचा वापर केला जात आहे.

अधिक दूध मिळावे म्हणून अनेकजण संकरित गायी सांभाळतात. मात्र तंत्रज्ञानाचा वापर करून गीर या देशी गायींची दूध देण्याची क्षमता वाढवून देशी गोवंश वाढवण्याचे काम सुलतानपूर येथील श्री भद्रा डेअरी फार्ममध्ये केले जात आहे. दोन वर्षांपूर्वी नऊ गायींपासून सुरू केलेल्या या डेअरी फार्ममध्ये सध्या पन्नास गीर गायी, ४० कालवडी आहेत. गायींपासून दुधाचे उत्पादन मिळतेच शिवाय शेणखतामुळे रासायनिक खतांचा वापर निम्म्यावर आला आहे. त्याशिवाय २५ एकरांवर पेरू, सीताफळ, केशर आंब्याची बाग शेणखत व अन्य घटकांद्वारे बहरतेय. शेणापासून तयार केलेला गांडूळ खत, बायोगॅसमधून निघणारी स्लरी, जीवामृताचा या बागेत वापर केला जात आहे. बायोगॅसपासून एका कुटुंबाची गरज भागेल इतका स्वयंपाकाचा गॅस तयार होत असल्याचे डेअरी फार्मचे व्यवस्थापक संजय मालोदे यांनी सांगितले.

हेही वाचा: हुश्श..! दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर आज संपली

माहितीसाठी तंत्रज्ञानाची मदत-

भद्रा डेअरी फार्ममध्ये एका विशिष्ट सॉफ्टवेअरद्वारे प्रत्येक गायीची इत्थंभूत अपडेट माहिती ठेवली जाते. प्रत्येक गायीच्या कानात सेन्सर असलेला टॅग आहे. त्याद्वारे गायीचा डाटा संगणक प्रणालीत साठवला जातो. गायीची रवंथ करण्याची प्रक्रिया, ती किती वेळा रवंथ करते, गोठ्यातील हालचाल, आजारपण, ‘हीट’वर आल्यास (माजावर) किती वेळात कृत्रिम रेतन करावे लागेल आदींची माहिती संगणक प्रणाली देते. गाय हीटवर आली हे लक्षात न आल्यास वेळेत कृत्रिम रेतन केले जात नाही. वेळ टळून गेल्यास कृत्रिम रेतनासाठी पुन्हा २१ दिवस वाट पाहावी लागते. यादरम्यान, किमान रोज २०० रुपये खर्च गृहीत धरला तरी २१ दिवसांचे चार हजार २०० रुपये शेतकऱ्याचा तोटा होतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा, वैज्ञानिक पद्धतीचा वापर गरजेचा आहे. शाश्वत दुग्धव्यवसाय करायचा असेल तर तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागणार असल्याचे मत फार्मचे डॉ. बी. बी. चव्हाण यांनी व्यक्त केले.

...तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही

आयव्हीएफ (भ्रूण प्रत्यारोपण) तंत्रज्ञानाने डेअरी फार्ममध्ये आतापर्यंत तेरा कालवडींनी जन्म घेतला आहे. यासंदर्भात फार्मच्या संचालिका वैशाली पाटील-चव्हाण म्हणाल्या, ‘आयव्हीएफ तंत्रज्ञानासाठी २५ हजार रुपयांपर्यंत किमान खर्च येतो. या तंत्रज्ञानातून जन्माला येणारी कालवड दूध देईल तेव्हा एका वेतात चार हजार लिटर म्हणजे रोज २५ ते ३० लिटर दूध देऊ शकते. दहा गायी सांभाळण्यापेक्षा या तंत्रज्ञानातून जन्मलेल्या दोन गायी पाळून शेतीला दुग्धपालनाची जोड दिली तर उत्पादन वाढेल. शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही. या तंत्रासह दुग्धव्यवसायासंदर्भात शेतकऱ्यांना इथे मोफत मार्गदर्शन केले जाते.’

हेही वाचा: अनर्थ टळला! रेल्वेने मुंबईला पळून चाललेल्या चार अल्पवयीन मुली ताब्यात

भद्रा डेअरी फार्ममध्ये आणखी काय?

-मुरघास, गहू, हरभऱ्याचा भुसा, सरकी, सोयाचोथा, मिनरल मिक्शचर, खाण्याचा सोडा, डाय कॅल्शिअम फॉस्फेट, खडे मीठ आदींचा वापर करून तयार केलेला पौष्टिक चारा

- मुरघासचा देशभरात केला जातो पुरवठा

- सहा महिन्यांत शेणखतापासून २० क्विंटल गांडूळ खत

- चारा व्यवस्थापनामुळे जन्मतात सुदृढ कालवडी

- ‘सेक्स सॉर्टेड सिमेन’मुळे केवळ इथे कालवडीच जन्माला येतात

- मुक्त संचार गोठा पद्धत, मजुरावरील खर्च कमी होतो

- दुग्धोत्पादनात वेळच्यावेळी लसीकरण

loading image