
Marathwada Muktisangram 2023 : स्वातंत्र्यपूर्व काळापासून थेरलाने जपली देशसेवेची परंपरा
- सुधीर एकबोटे
पाटोदा तालुक्यातील थेरला गावाने देशसेवेसाठी दिलेल्या योगदानाची परंपरा आजतागायत जपली असून याच गावातील स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या ५० स्वातंत्र्यसैनिकांपैकी काहींनी अक्षरशः आपल्या प्राणांची आहुती देत बलिदानही दिले. यानंतर ७० वर्षांनंतर आजही थेरला गावातील ५० ते ६० तरुण मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर असून देशासाठी लढत असताना याच मातीतील ४ तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती देत देशासाठी बलिदान दिले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात थेरला हे गाव निजाम राजवटीत येत होते. दरम्यान स्वातंत्र्यसैनिक नरवीर काशीनाथराव जाधव आणि ओझे काका, सुवालाल कांकरिया यांनी या गावातील तरुणांना एकत्र केले आणि निजामाच्या होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढा उभारण्याची व त्यांच्या मनात एका नव्या क्रांतीची ज्योत पेटवली. त्यांनी गावातील ४० ते ५० तरुणांची एक फौजच तयार केली. आजूबाजूच्या डोंगरांमध्ये बैठका बसू लागल्या. निजामाला विरोध करण्यासाठी डावपेच आखले जाऊ लागले आणि निजामाच्या अत्याचाराला प्रतिकार सुरू झाला.
यामध्ये विशेषतः महादेव राख, भगवान राख, ज्ञानोबा राख, भीमराव राख, गेनाजी राख, लहानू राख, आश्रुबा राख, बापूराव राख, बाबासाहेब राख, बाबूराव राख यांच्यावर निजाम पोलिस डोळा ठेवून होते. यापैकी आश्रुबा राख यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. तर थेरला गावापासून जवळच असलेल्या सौताडा गावातील निजामाची चौकी जाळल्यानंतर भीमराव राख व बापूराव राख हे निजाम पोलिसांच्या हाती लागले.
तर पळत असताना बाबूराव राख पोलिसांच्या बंदुकीची गोळी लागून शहीद झाले. यानंतर हाती लागलेल्या भीमराव राख व बापूराव राख यांना तुरुंगात डांबण्यात आले. वर्षभराची शिक्षा भोगून झाल्यावर ते दोघे तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाले. देशसेवेचा वसा घेतलेल्या थेरला गावात देशसेवेची परंपरा आजतागायत कायम आहे. स्वातंत्र्यानंतर आजही गावातील शंभराच्या पुढे तरुण देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहेत. चार जवान शहीद झाले आहेत. यामध्ये सुनील राख, भागवत राख, तुकाराम राख, मदन राख यांचा समावेश आहे.