अडचणींवर मात, टाकली कात!

संधी, गरजांचा अभ्यास करून भराटेंनी व्यवसायात केलेले बदल यशस्वी
Sunil Bharate Business strategy news aurangabad
Sunil Bharate Business strategy news aurangabadsakal

औरंगाबाद : उद्योग, व्यवसायात तोटा झाला, अडचणी आल्या तर अनेक जण उद्योग, व्यवसाय बंद करतात. मात्र अडचण ही संधी मानून पुढे गेल्यास यश संपादन करता येते. येथील सुनील भराटे यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे. श्री व्हीला पॉली प्रॉडक्टस प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून त्यांनी मार्केटमधील उपलब्ध संधी, ग्राहकांच्या गरजेनुसार व्यवसाय, उत्पादनात बदल केले. सुरवातीला त्यांनी ऑटोमोबाईल पार्ट, त्यानंतर सायकल स्टॅन्ड, कॅरिअर बनविले. आता ते कृषीपूरक उत्पादने तयार करत आहे. सोबतच एसी स्टॅन्ड, बेड-सॉकेट, केबल ट्रे, सिमेंट रोडसाठीचे डिश तयार करण्याचे काम ते कंपनीच्या माध्यमातून करीत आहेत.

सुनील भराटे हे मूळचे केज (जि. बीड) येथील. बालपणापासूनच ते औरंगाबाद शहरातील जयभवानीनगरात वास्तव्यास आले. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर काही महिने वाळूज येथील बड्या कंपनीत रोजंदारीवर काम केले. या कंपनीतील यंत्रसामग्री, व्यवसाय बघितल्यानंतर त्यांनीही स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. २००७ मध्ये त्यांनी बालाजी इंडस्ट्री नावाने कंपनीची स्थापना केली. वाळूज एमआयडीसीमध्ये जागा भाड्याने घेऊन ऑटोमोबाईल पार्टचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सेकंड हॅण्ड मशिनरी विकत घेतली. याच्या माध्यमातून त्यांनी दुचाकी, तीनचाकी वाहनानांचे सुटे भाग (पार्ट) तयार करण्यास सुरवात केली. हे काम करताना त्यांना २०१० मध्ये श्रीव्हीला पॉली प्रॉडक्टस प्रा. लि. ही कंपनी विक्रीस असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ती खरेदी केली. त्यामुळे जागा आणि मशिनरी आली. यानंतर त्यांनी बालाजी इंडस्ट्री ही श्री व्हीला पॉली प्रॉडक्ट लि. मध्ये विलीन केली. या कंपनीत त्यांची पत्नी नीता भराटे संचालिका आहेत.

ऑटोमोबाईलमध्ये सुटे भागा तयार करत असताना पुरेसा नफा मिळत नव्हता. त्यामुळे वेगळ्या कंत्राट, व्यवसायाच्या शोधात ते होते. त्यावेळी त्यांना सिन्नर (नाशिक) येथील एका सायकल कंपनीचे कंत्राट मिळाले. त्यांनी या कंपनीला सायकल स्टॅन्ड आणि कॅरिअर तयार करून देण्यास सुरवात केली. त्यावेळी सायकल विक्री चांगली असल्याने त्यांच्या व्यवसायालाही उभारी मिळाली. २०११ ते २०१७ पर्यंत त्यांनी हे काम केले. त्यानंतर सिन्नरची कंपनी चेन्नईत गेली. त्यामुळे सुनील भराटे अडचणीत आले. हार न मानता त्यांनी कृषी उत्पादन क्षेत्रात लागणारे सुटे भाग तयार करायला सुरवात केली.

मार्केटचा केला अभ्यास

कृषी क्षेत्रातील यंत्रणेला लागणाऱ्या सुट्या भागांच्या निर्मितीसाठी त्यांनी मार्केटचा अभ्यास केला. ठिकठिकाणी शेतकरी, दुकानदारांशी संवाद साधला. शेतीशी निगडित मार्केट व उत्पादनांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी कृषीशी संबंधित सुटे भाग, उत्पादने तयार करण्याचा निर्णय घेतला. वन टाइम कृषी सामग्री, पार्ट तयार करणाऱ्या मशीन खरेदी केल्या. यानंतर त्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली फाळके, पेरणी यंत्र कॅलम्प, सहारा यंत्र, ट्रॅक्टर हॅण्डल, इंजिस, ट्रॉली पिन तयार करायला सुरवात केली. मागणीनुसार अन्य साहित्य निर्मितीवरही भर दिला. आता त्यांच्या कृषी उत्पादनांना औरंगाबाद, जालना, नगर, बुलडाणा, उस्मानाबाद जिल्ह्यांतून चांगली मागणी आहे. एकाच छताखाली अनेक कृषी उत्पादने देण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला.

अन्य उत्पादनांवरही भर

वाळूज येथे साडेसहा हजार चौरस फूट क्षेत्रात प्रकल्प आहे. त्यांच्या कंपनीत १८ जणांना रोजगार मिळाला आहे. कृषी उत्पादनांवर शेतकऱ्यांना सबसिडी मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. कृषी उत्पादनांसोबत सुनील भराटे हे आऊटडोर एसी स्टॅन्ड, बेड-सॉकेट, केबल ट्रे, सिमेंट रोड तयार करताना लागणाऱ्या डिशचे उत्पादन करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com