
Aurangabad News : तब्बल १९३ कोटींच्या निविदेचे आठ दिवसांत निघणार आदेश
औरंगाबाद : राज्य शासनाने जुन्या ७०० मिलिमीटर व्यासाच्या पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण करून त्याठिकाणी ९०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेतून १९३ कोटींचा निधी मिळणार आहे.
त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया राबविली पण या कामाला प्रशासकीय मान्यता नव्हती. आता शासनाने प्रशासकीय मान्यता देताच प्राधिकरणाने शुक्रवारी (ता. १७) निविदा उघडल्या. येत्या दहा दिवसांत पात्र निविदाधारकाला कार्यारंभ आदेश देण्याची तयारी अधिकाऱ्यांनी केली आहे.
औरंगाबाद शहरासाठी नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम आहे. हे काम आता अमृत-२ योजनेत समाविष्ट करण्यात आले असून, १६८० कोटी रुपयांची ही योजना आता २७४४ कोटींवर गेली आहे. या योजनेचे काम पूर्ण होण्यास २०२४ उजाडणार आहे.
तोपर्यंत शहरवासीयांना दिलासा मिळाला यासाठी जुन्या ५६ एमएलडी क्षमतेच्या (७०० मिलिमीटर व्यास) योजनेचे बळकटीकरण करण्याचा पर्याय समोर आला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना केल्या होत्या. त्यानंतर १९३ कोटींच्या या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली होती.
राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीने देखील त्याला मान्यता दिली होती. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कामाची निविदा काढली. पण प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे फायनान्शिअल बिड प्राधिकरणाने उघडले नव्हते. दरम्यान प्रशासकीय मान्यतेचे पत्र प्राधिकरणाला शुक्रवारी (ता. १७) प्राप्त झाले. पत्र प्राप्त होताच फायनान्शिअल बिड उघडण्याची प्रक्रिया प्राधिकरणाने केली.