एन्ट्री पॉइंटवरील चाचण्या अखेर बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aurngabad

Aurangabad : एन्ट्री पॉइंटवरील चाचण्या अखेर बंद

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिकेतर्फे दीड वर्षांपासून सहा एन्ट्री पॉइंटवर प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात होती. मात्र, खासगी बस चालकांसोबतचे वारंवारचे वाद, प्रवाशांमधून होणारा विरोध लक्षात घेता, महापालिकेने एन्ट्री पॉइंटवरील चाचण्या बंद केल्या आहेत. असे असले तरी शहराच्या इतर भागात गर्दीच्या ठिकाणी मात्र चाचण्या सुरूच आहेत.

कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर इतर ठिकाणाहून शहरात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला होता. चिकलठाणा, हर्सूल टी पॉईंट, कांचनवाडी, झाल्टा फाटा, नगर नाका येथे या ठिकाणी करण्यात आलेल्या हजारो ॲन्टीजेन चाचण्यांमुळे शहरातील संभाव्य संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आले. दरम्यान औरंगाबाद लगत असलेल्या नगरसह इतर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने एन्ट्री पॉइंटवरील तपासणी कडक करण्यात आली.

मात्र अनेक खासगी बस चालकांनी याठिकाणी वाद घातले. चाचणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अपहरण केल्याचे दोन प्रकार घडले. त्यामुळे पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी करण्यात आली. पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान एसटीच्या बंदमुळे रस्त्यांवरील वर्दळही कमी झाली आहे. त्यात गेल्या आठ दिवसांपासून एन्ट्री पॉइंटवरील ॲन्टीजेन चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत.

१५ ठिकाणी चाचण्या

एन्ट्री पॉइंटवरील कोरोना चाचण्या बंद करण्यात आल्या असल्या तरी शहरातील इतर गर्दीच्या भागात मात्र चाचण्या सुरूच आहेत. रिलायन्स मॉल, शासकीय वैद्यकीय महाविद्याल, प्रझोन मॉल, डिमार्ट, एमजीएम क्रिडा संकुल, किलेअर्क कोविड सेंटर, पदमपुरा कोविड सेंटर, मेल्ट्रॉन कोविड सेंटर, बिबी-का-मकबरा, राज क्लॉथ, सिद्धार्थ उद्यान, रेल्वेस्टेशन, सिडको बस स्थानक, विमानतळावर चाचण्या केल्या जाणार आहेत.

loading image
go to top