
Crime News : पोलीस प्रशासन जागे व्हा; रात्री बारा ते एक दुचाकी चोरीचा टायमिंग
छत्रपती संभाजीनगर : शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरट्यांनी अक्षरशः पोलिसांना आव्हान दिल्याचे चित्र समोर आले आहे. पोलिसांनीही अंग झटकून कामाला लागत कारवाया केल्या, मात्र, चोरीला गेल्या दुचाकीच्या तुलनेत सापडलेल्या दुचाकींचा आलेख मात्र, काही केल्यावर येताना दिसत नाही.
विशेष म्हणजे चोरटेही स्मार्ट झाले असून त्यांनीही चोरीच्या वेळा, ठिकाणे बदलली असून चोरीच्या दुचाकींची विक्री करण्याचे फंडे बदलले आहेत. यावर गुन्हे शाखेने अभ्यासपूर्ण विश्लेषण केले असून यामध्ये प्रामुख्याने मध्यरात्री १२ ते १ याच वेळेत सर्वात जास्त दुचाकी चोरी झाल्याचे गुन्हे शाखेच्या निष्कर्षात समोर आले आहे. २०२२ या वर्षभरात तब्बल ९२४ दुचाकी चोरी गेल्या होत्या, मात्र हेच जानेवारी ते एप्रिल अखेर या चार महिन्याचे प्रमाण अडीचशे दुचाकीवर पोहोचले आहे.
खासकरून जानेवारी ते एप्रिल २०२३ या चार महिन्यात चोरट्यांनी सकाळी सहा ते सात या एका तासात दोन दुचाकी चोरी केल्या असून याचे प्रमाण एक टक्का आहे. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सर्वात जास्त म्हणजेच ३७ वाहन चोरीच्या घटना आढळून आल्या आहेत. हेच ठिक ठिकाणची आकडेवाही पडताळल्यास सर्वात जास्त घाटी रुग्णालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत.
या एकाच तासात गेल्या तब्बल २३ दुचाकी चोरी
चोरट्यांनी दुचाकी चोरीसाठी मध्यरात्री १२ ते एक ही वेळ दुचाकी चोरीसाठी निवडल्याचे समोर आले आहे. या एकाच तासात शहरातील विविध भागातून तब्बल २३ दुचाकी तर सहा मोठी वाहने अशी एकूण २९ वाहने (जानेवारी ते एप्रिल २०२३) चोरी गेले. हे प्रमाण दहा टक्क्यावर गेले आहे. त्यानंतर मध्यरात्री एक ते दोन या तासाभरात चोरट्यांनी २० दुचाकी तर तीन मोठी वाहने अशी २३ वाहनचोरी केली.
एकंदरीत वाहनचोरीचा निष्कर्ष सांगतो की, सायंकाळी सहा ते सात (१२ वाहने) आणि रात्री नऊ वाजेपासून पहाटे दोन या वेळेत तब्बल १११ वाहन चोरी झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर चोरटे तासभर चोरी करत नाहीत, पुन्हा पहाटे चार ते पाच या तासाभरातच चोरट्यांनी एकूण १६ वाहने चोरी केली आहे.