
प्रभाग रचना आक्षेपांवर चार टप्प्यांत सुनावणी
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी चार स्लॉटमध्ये होणार असून आक्षेपधारकांना टोकन क्रमांक देण्यात येणार असून त्या टोकननुसार सुनावणीचे टप्पे तयार केले आहेत. मौलाना आझाद संशोधन केंद्रात सुनावणीची प्रक्रिया होणार आहे. सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरू होणार आहे.
सुनावणीसाठी चार स्लॉट पाडण्यात आले आहेत. ज्या आक्षेपांबद्दल जास्तवेळ सुनावणी चालेल असे प्रशासनाला वाटते अशा बावीस आक्षेपांवर दुपारी चारनंतर सुनावणी होईल. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यात १२६ वॉर्डांसाठी ४२ प्रभाग करण्यात आले आहेत. एका प्रभागात तीन वॉर्डांचा समावेश करण्यात आला आहे.
हा आराखडा आणि प्रभागांच्या हद्दींचा नकाशा आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने २ जून रोजी प्रसिद्ध केला. त्यावर १६ जूनपर्यंत सूचना - हरकती मागविण्यात आल्या. ३७४ सूचना आणि हरकती प्राप्त झाल्या आहेत. ही सुनावणी घेण्यासाठी निवडणूक आयोगाने पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती केली आहे.महापालिकेचे उपायुक्त तथा निवडणूक विभागाचे प्रमुख डॉ. संतोष टेंगळे यांनी सुनावणीच्या नियोजनाविषयी सांगितले, की चार स्लॉटमध्ये सुनावणी घेतली जाणार आहे. टोकन क्रमांक १ ते १० पर्यंतची सुनावणी सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेदरम्यान घेतली जाणार आहे.
टोकन क्रमांक ६७ ते ७१ आणि ७२ ते ८० ची सुनावणी सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान घेतली जाणार आहे. टोकन क्रमांक ८१ ते ८४ ची सुनावणी दुपारी ४ वाजेनंतर घेतली जाणार आहे. पहिल्या स्लॉटमध्ये वर्णन आणि नावाबद्दलच्या हरकतींचा समावेश आहे. दुसऱ्या स्लॉटमध्ये हद्दींबद्दलच्या आक्षेपांचा समावेश करण्यात आला आहे, तर तिसरा स्लॉट इतर आक्षेपांचा समावेश असल्याचे डॉ. टेंगळे म्हणाले.
Web Title: Ward Formation Objections Hearing In Four Stages
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..