Rural Hospital : आठ वैद्यकीय अधिकारी, तरी ‘रेफर’ घाटीची वारी!

विवाहितेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू : कन्नडमधील ग्रामीण रुग्णालय बनले प्रथमोपचार केंद्र
Rural Hospital
Rural Hospitalsakal

कन्नड : कन्नड ग्रामीण रुग्णालयात आठ वैद्यकीय अधिकारी आहेत. तरी रुग्णांना सर्रास घाटी रुग्णालयात रेफर केले जाते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाची अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रापेक्षाही वाईट झाली आहे.

सातकुंड येथील विवाहिता काजल कृष्णा राठोड (वय २०) हिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. आज (ता.१६) सकाळी तिची प्रसूती झाली. मात्र, गर्भपिशवी बाहेर आल्याने तिला घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले. सकाळी नऊच्या सुमारास रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा ‘कारभार’ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

यासंदर्भात रात्री कर्तव्यावर असलेले डॉ. रुपेश माटे यांनी सांगितले, की काजल राठोड या रात्री एक वाजता कन्नड ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. तेव्हा त्या सुस्थितीत होत्या. त्यांचे हे पहिलेच बाळंतपण होते. सात वाजता त्यांची प्रसूती झाली.

मात्र त्यांची गर्भपिशवी बाहेर आली. त्यामुळे आम्ही गर्भपिशवी आत ढकलून तिला सुस्थितीत आणले. या ठिकाणी भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ व ऑपरेशन थिएटर नसल्याने त्यांना अॕम्ब्युलन्सने औरंगाबाद शासकीय रुग्णालय घाटी येथे पाठवले. दवाखान्यात पोचण्यापूर्वीच सकाळी नऊच्या सुमारास हतनूरजवळ त्यांचा मृत्यू झाला.

मृत विवाहितेचे काका सुनील मूलचंद जाधव यांनी सांगितले, की हिवरखेडा गौताळा येथील भरत गलचंद जाधव, सुशीला जाधव यांना काजल ही एकुलती एक मुलगी होती. तिचा विवाह सातकुंड येथील कृष्णा ताराचंद राठोड यांच्याशी झाला होता.

मृताचे पती महाराष्ट्र पोलिस मुंबई येथे सेवेत आहेत. कन्नड ग्रामीण रुग्णालयात कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या तर तिला दाखल करून का घेतले? आमची एकुलती एक मुलगी आमच्या हातातून गेली. जाण्यापूर्वी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ती जन्मतःच अनाथ झाली आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरदसिंग परदेशी यांनी सांगितले, की ग्रामीण रुग्णालयात मी स्वतः कान, नाक घसा तज्ज्ञ आहे. एकूण माझ्यासहित आठ वैद्यकीय अधिकारी आहेत.‌ डॉ. ऋतुजा थोरात, डॉ. प्रशांत कोंडेकर, डॉ. प्रवीण पवार, डॉ. रूपेश माटे, डॉ. नीलेश अहिरराव, डॉ. मनीषा मोतिंगे,

डॉ.पंकज जाधव येथे आहेत. ट्रॉमा सेंटर मंजूर असूनही याठिकाणी अद्ययावत ऑपरेशन थिएटर नाही. भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ नाहीत. त्यामुळे सदरील महिलेला औरंगाबाद येथे पाठवण्यात आले.दरम्यान, या महिलेवर सातकुंड येथे सासरी रात्री आठ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.

विधानसभेत प्रश्‍न उपस्थित करणार

आमदार उदयसिंग राजपूत यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विधानसभेत करणार आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेत या महिलेसोबत परिचारिका, डॉक्टर नव्हते. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत या महिलेला का पाठवले नाही? ग्रामीण रुग्णालयातील या अनागोंदी कारभारामुळे सामान्य माणसांचे जीव जात आहेत, हे गंभीर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com