Chhtrapati Sambhaji Nagar : तोपर्यंत औरंगाबादच्या नावात बदल नको; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Writ Petition Filed in High Court Change of Name of Aurangabad District Chhatrapati Sambhajinagar astik kumar pandey

Chhtrapati Sambhaji Nagar : तोपर्यंत औरंगाबादच्या नावात बदल नको; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाकडून छत्रपती संभाजीनगर नामांतराला मंजुरी मिळताच काही शासकीय कार्यालयांनी या नावाची अंमलबजावणी सुरू केली. तथापि, उच्च न्यायालयाचे नामांतरासंदर्भात पुढील आदेश येईपर्यंत नावात बदल न करण्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व कार्यालयप्रमुख, विभागप्रमुखांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर अनेक ठिकाणी सर्रास बदललेल्या नावाचा उल्लेख सुरू झाला आहे. तर काही शासकीय कार्यालयांनीही कार्यालयांच्या नामफलकात नवीन नावाने बदल केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी नुकतेच याबाबत जिल्ह्यातील सर्व कार्यालयप्रमुख व विभागप्रमुखांना कार्यालयीन आदेश जारी केले आहेत.

त्यात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या अनुषंगाने उच्च न्यायालय , मुंबई येथे रिट याचिका दाखल झाली आहे. नामांतराबाबत प्राप्त झालेल्या आक्षेपांची सुनावणी चालू असताना महसुल व इतर विभागांशी संबंधित कार्यालये जिल्ह्याचे नाव बदलत असल्याची बाब याचिकाकर्ते व त्यांच्या विधिज्ञांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

त्यावर उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधीत कोणत्याही कार्यालयांनी औरंगाबाद नावात बदल न करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. उच्च न्यायालयाच्या २० एप्रिल २०२३ रोजी दिलेल्या आदेशाचे व आदेशातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे जिल्हाधिकारी श्री. पांडेय यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.