कपाशीवर वाढला शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - यंदा जुलै महिन्यातच कपाशीवर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. एरवी ही अळी सप्टेंबरनंतर पाहायला मिळते; पण यावर्षी दोन महिने अगोदरच ती पिकाला कुरतडत आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झालेत. 

औरंगाबाद - यंदा जुलै महिन्यातच कपाशीवर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. एरवी ही अळी सप्टेंबरनंतर पाहायला मिळते; पण यावर्षी दोन महिने अगोदरच ती पिकाला कुरतडत आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झालेत. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी विभागांतर्गत शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. पवार, डॉ. एन. आर. पतंगे, डॉ. आर. ए. चव्हाण, रामेश्‍वर ठोंबरे, संतोष आळसे, ज्ञानेश्‍वर तारगे यांच्या चमूने केलेल्या पाहणीत हा प्रादुर्भाव आढळून आला. दरम्यान, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्ह्यात हा प्रादुर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास आले. मराठवाडात दरवर्षी १२ ते १३ लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड केली जाते. मात्र, गतवर्षी चांगला भाव मिळाल्याने यंदा ती १५ लाखांवर गेली आहे. 

लवकर प्रादुर्भाव कशामुळे?
दरवर्षी कपाशीवर ऑक्‍टोबरदरम्यान शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव होतो. मात्र, यंदा तो तब्बल दोन महिने अगोदरच झाल्याचे दिसून आले. याची कारणे जाणून घेतली असता मागील वर्षी सप्टेंबर महिनाअखेरीस पाऊस झाला. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांनीही फरदडचे घेण्याचे प्रमाण वाढवले. नॉनबीटीची लागवड केली नाही. मे-जूनपर्यंत जिनिंग चालले. त्यामुळे सिझन लांबला. परिणामी, अळ्यांचे प्रजनन चालूच राहिले. किडींची सतत वाढ होत राहिली.

अशातच जूनच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे लवकरच कपाशीची लागवड लवकर झाली. नंतर प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली.

अशी करा उपाययोजना 
फुलातील अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
हेक्‍टरी पाच ते सात कामगंध सापळे लावावेत. त्यात पडणाऱ्या पतंगाची नोंद ठेवावी. यावरून पुढची काळजी घेण्याचे गणित ठरविता येते.

प्रोफेनॉफॉस २० मिली १० लिटर पाण्यात किंवा थायोडीकार्ब २० ग्रॅम १० लिटर पाण्यात, लॅम्डासायहॅलोथ्रीन १५ मिली १० लिटर पाण्यात किंवा सायपरमेट्रीन १५ मिली प्रती १० लिटर किवा क्विनालफॉस २० मिली हे प्रमाण साध्या पंपासाठी असून पॉवर स्प्रे किंवा पेट्रोलपंपासाठी अडीच ते तीनपट करावे, अशी शिफारस परभणी कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आली आहे.

शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव एक ते दीड महिने असाच राहिला तर उत्पादनात घट येईल. ही अळी कपाशी फुलाच्या आत असल्याने त्यावर शंभर टक्के नियंत्रण मिळविता येत नाही. परिणामी, उत्पन्नाच्या २० ते २५ टक्के घट येऊ शकते.
- प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, कीटकशास्त्रज्ञ, लातूर कृषी महाविद्यालय.  

Web Title: aurangbad news agriculture cotton