'नियमित व्यायाम हेच रामबाण औषध'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - समजून-उमजून नियमित केलेला व्यायाम हा हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी करतो. त्यामुळे ‘व्यायाम हेच रामबाण औषध’ हे सूत्र मनाशी पक्के बाणवून प्रत्येकाने व्यायामाला सुरवात करावी, असे प्रतिपादन प्रख्यात हृदयरुग्ण पुनर्वसन तज्ज्ञ डॉ. आशिष कॉन्ट्रॅक्‍टर यांनी केले.

औरंगाबाद - समजून-उमजून नियमित केलेला व्यायाम हा हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी करतो. त्यामुळे ‘व्यायाम हेच रामबाण औषध’ हे सूत्र मनाशी पक्के बाणवून प्रत्येकाने व्यायामाला सुरवात करावी, असे प्रतिपादन प्रख्यात हृदयरुग्ण पुनर्वसन तज्ज्ञ डॉ. आशिष कॉन्ट्रॅक्‍टर यांनी केले.

मॅरेथॉन धावपटूंची स्वयंसेवी संघटना ‘औरंगाबाद ब्लॅक बक’ यांच्यातर्फे ‘हृदयाचे आजार आणि चैतन्यमयी जीवन’ या विषयावर शनिवारी (ता. २५) डॉ. कॉन्ट्रॅक्‍टर यांचे देवगिरी महाविद्यालयाच्या विश्वकर्मा सभागृहात व्याख्यान झाले. नियमित मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे मुंबईमधील झिपर्स क्‍लबचे प्रमुख पी. वेंकटरमण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अजित इनामदार, रमेश पुरी, मनमोहन तलवार यांनी अनुभवकथन केले.

या प्रसंगी डॉ. कॉन्ट्रॅक्‍टर यांनी लिहिलेल्या ‘हार्ट ट्रुथ’ या पुस्तकाचे प्रकाशन ब्लॅक बकचे ज्येष्ठ सदस्य मुकुंद भोगले, डॉ. बालाजी आसेगावकर आणि पी. वेंकटरमण यांच्या हस्ते करण्यात आले. देवगिरी सायकलिंग क्‍लबचे डॉ. मंगेश दसरे यांनी सादरीकरण केले.

डॉ. मंगेश पानट यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शहरातील नामवंत डॉक्‍टर, उद्योजक, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

आरोग्याची चतुःसूत्री
‘‘अनेक आजारांना प्रतिबंध करणारे आणि अनेकांचा धोका कमी करणारे व्यायाम हे सर्वात स्वस्त औषध आहे. व्यायाम किती करावा, अतिरिक्त व्यायामाचे धोके समजावून घेतलेच पाहिजेत. त्याबाबत डॉक्‍टरांशी बोला, त्यांचा सल्ला घ्या. चालणे, धावणे, सायकलिंग असा कोणताही व्यायामाचा प्रकार आरोग्यासाठी चांगलाच आहे, फक्त पहिले पाऊल उचलणे गरजेचे आहे. ‘किती, कसा, किती वेळ आणि कोणता व्यायाम’ या चतुःसूत्रीवर आपला व्यायाम आधारित हवा. व्यायामाने फिटनेस वाढतो तशीच प्रतिकारशक्तीही वाढते, ज्या गोष्टी करणे आधी अशक्‍य वाटतात त्या सहज करता येतात,’’ असे डॉ. आशिष कॉन्ट्रॅक्‍टर यांनी सांगितले.

Web Title: aurangbad news exercise health