लेखिका तस्लीमा नसरीन यांना औरंगाबादेत प्रवेश नाकारला

लेखिका तस्लीमा नसरीन यांना औरंगाबादेत प्रवेश नाकारला

औरंगाबाद - प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांना अजिंठा-वेरूळ लेणी बघण्याचा अधिकार आहे, की नाही  हे ठरविण्याचा अधिकार ‘एमआयएम’ने हाती घेतला आणि लोकशाही देशात पोलिस प्रशासनाच्या साक्षीने तस्लीमा नसरीन यांना आपल्या मुलीसह औरंगाबाद विमानतळावरून मुंबईला परतावे लागले. विरोध करणाऱ्या ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांनी विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ गोंधळ घातला. 

आपल्या लिखाणाने जगभर ओळखल्या जाणाऱ्या तस्लीमा नसरीन यांनी तीन दिवसांच्या पर्यटनासाठी औरंगाबादेत येण्याचे नियोजन केले होत. येथील ‘ताज हॉटेल’मध्ये थांबून त्या अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यासाठी जाणार होत्या. त्यानुसार दिल्लीहून एअर इंडियाच्या विमानाने (विमान-४४१) त्या मुलीसह सायंकाळी ७.३५ वाजता चिकलठाणा विमानतळावर आल्या. विमानतळावर त्या आल्याची माहिती कळताच विमानतळाच्या सुरक्षा दलाने (सीएसएफआय) पोलिसांना माहिती दिली. चिकलठाणा एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ विमानतळ गाठत तस्लीमा नसरीन यांची भेट घेतली. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने तुम्हाला माघारी परतावे लागेल, अशी विनंती पोलिसांनी त्यांना केली. या संदर्भातील पत्रही पोलिसांनी बरोबर नेले होते. पोलिसांच्या विनंतीनुसार नसरीन आलेल्या विमानाने परत मुंबईकडे रवाना झाल्या.

‘एमआयएम’ची घोषणाबाजी
तस्लीमा नसरीन शहरात येणार असल्याची कुणकुण लागताच ‘एमआयएम’चे शेकडो कार्यकर्ते सायंकाळी साडेसातला ‘हॉटेल ताज’समोर आले. त्यांनी तेथे गोंधळ घातला. बंदोबस्त लावत पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगविले. त्यानंतर ‘एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्त्यांनी विमानतळ गाठले. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर नसरीन यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे विमानतळाचे दोन्ही गेट पोलिसांनी बंद केले. जवळपास अर्धा तास विमानतळावर तणावाची परिस्थिती होती. पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. पोलिस उपायुक्‍त राहुल श्रीरामे यांच्यासह मोठा फौजफाटा विमानतळावर दाखल झाला.

एअर इंडियाचे सहकार्य
दिल्लीहून आलेल्या विमानातून नसरीन येथे आल्या होत्या. विरोधानंतर त्याच विमानाने त्यांना मुंबईला परतावे लागले. पोलिस आणि ‘सीएसएफआय’च्या विनंतीमुळे एअर इंडियाचे व्यवस्थापक अजय भोळे यांनी विमानाची वेळ वाढवून दिली. तत्काळ मुंबईसाठी दोन तिकिटे उपलब्ध करून दिली. यामुळे विमानाला काही काळ उशीर झाला.

मग विरोध कशासाठी?
तस्लमा नसरीन यांनी औरंगाबाद भेट निश्‍चित केली तेव्हा त्यांनी आवश्‍यक त्या साऱ्या प्रक्रिया पूर्ण केल्या असतीलच. त्याशिवाय एअर इंडियाच्या विमानाने त्या दिल्लीहून येथे आल्या. त्यांना विमानाचे तिकीट मिळाले होतेच. विरोधानंतर त्यांना परत पाठविण्याचे ठरले तेव्हाही विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिल्लीहून आलेले विमान थांबवून त्यांना तिकीट उपलब्ध करून दिलेच. ‘ताज हॉटेल’मध्ये त्या थांबणार होत्या, म्हणजे त्यांनी नोंदणीही केली असणार. या साऱ्या प्रक्रियेत कुठे विरोध झाला नाही. मग दौऱ्यासाठी कसा, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला.

तस्लीमा नसरीन यांना जगभरातील मुस्लिमांचा विरोध आहे. त्यांना आम्ही औरंगाबादेत पाय ठेवू देणार नाही. त्या औरंगाबादेत आल्याची माहिती मिळताच शेकडो कार्यकर्ते विमानतळावर आले होते. पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गेटने बाहेर आणले असते तर अजिंठा, वेरूळ येथेही आमचे कार्यकर्ते पोचले असते. त्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर राहिली असती.
- इम्तियाज जलील, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com