गुंतवणुकीत 'ऑरिक' देशात अव्वल!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

औरंगाबाद - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) माध्यमातून देशात उभारण्यात येत असलेल्या चार औद्योगिक शहरांमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर ठरले आहे. आतापर्यंत 50 भूखंड वितरणाच्या माध्यमातून 3600 कोटींची गुंतवणूक पटकाविण्यात शेंद्रा येथील औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी यशस्वी ठरली आहे.

औरंगाबाद - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) माध्यमातून देशात उभारण्यात येत असलेल्या चार औद्योगिक शहरांमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर ठरले आहे. आतापर्यंत 50 भूखंड वितरणाच्या माध्यमातून 3600 कोटींची गुंतवणूक पटकाविण्यात शेंद्रा येथील औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी यशस्वी ठरली आहे.

"डीएमआयसी'च्या माध्यमातून या दोन शहरांदरम्यान चार औद्योगिक क्षेत्रांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये ग्रेटर नोयडा (दिल्ली), उज्जैन (मध्य प्रदेश), ढोलेरा (गुजरात), शेंद्रा-बिडकीन (महाराष्ट्र) या ठिकाणी औद्योगिक शहरे उभारण्याचे काम तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे. यादरम्यान पहिल्या टप्प्यातील कामे हाती घेऊन उद्योगांना आमंत्रित करण्याचा सिलसिला सुरू झाला. या आवाहनांना प्रतिसाद देत औरंगाबादलगत अस्तित्वात आलेल्या शेंद्रा येथील औद्योगिक शहराला गुंतवणुकीसाठी पसंती दिली आहे.

"डीएमआयसी'च्या तिन्ही शहरांना भूखंड वितरणाचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. यामध्ये उज्जैनच्या विक्रम उद्योगपुरीमध्ये दोन (भूखंडांचे क्षेत्रफळ - 160,030 चौ.मी.), गुजरातची ढोलेरा इंडस्ट्रियल सिटी (भूखंडांचे क्षेत्रफळ - 161,874 चौ.मी.) आणि ग्रेटर नोएडा (भूखंडांचे क्षेत्रफळ - 554,406 चौ.मी.) येथे प्रत्येकी तीन, तर औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी(ऑरिक)मध्ये 507,164 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या 50 भूखंडांची वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता, सहसरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी प्रतिसाद दिला नाही.

गुंतवणुकीत "ऑरिक'च अव्वल
कंपन्यांची गुंतवणूक मिळविण्यात "ऑरिक'ने बाजी मारली आहे. ह्योसंगच्या माध्यामातून ऑरिकला मिळालेला अँकर प्रकल्प बुस्टर डोस ठरला आहे. "ऑरिक'ने "डीएमआयसी'च्या तीन अन्य शहरांना मागे टाकत 3600 कोटींची एकूण गुंतवणूक प्राप्त केली आहे. शेंद्रा ऑरिकपाठोपाठ ग्रेटर नोएडा- 3404 कोटी, ढोलेरा इंडस्ट्रियल सिटी- 935 कोटी आणि विक्रम उद्योगपुरी यांचा क्रमांक लागतो. रोजगाराच्या दृष्टीने मात्र ऑरिक दुसऱ्या स्थानी असून, नोएडामध्ये रोजगार संधींचा आकडा 6600 एवढा आहे. ऑरिकमध्ये दोन हजार जणांना आतापर्यंतच्या गुंतवणुकीतून रोजगार मिळणार आहे. ढोलेराबाबत हा आकडा जाहीर झालेला नाही; तर विक्रम उद्योगपुरीत 350 जणांना थेट रोजगार मिळणार आहे.

Web Title: Auric Company Investment Topper in India