गळ टोचण्याची प्रथा होणार बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

लाल सेनेचे आंदोलन
औरंगाबाद - मांगवीरबाबा यात्रेत लोखंडी गळ टोचून घेणे आणि बोकडबळीची प्रथा बंद करावी, या मागणीसाठी लाल सेनेने शनिवारी (ता. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात गणपत भिसे, अशोक उफाडे, उत्तम गोरे, श्रीरंग ससाणे, कोंडिबा जाधव, प्रकाश बनपट्टे, राम वैराळ, ज्ञानेश्‍वर मोरे, दत्ता तांबे आदी सहभागी झाले होते.

औरंगाबाद - शेंद्रा येथील मांगवीरबाबांची दोनदिवसीय यात्रा बुधवारपासून (ता. चार) सुरू होत आहे. यात्रेत भाविक कोंबड्या, बकऱ्यांचा बळी देत स्वतः गळ टोचून घेतात. ही अघोरी प्रथा बंद व्हावी, अशी मागणी लाल सेनेच्या वतीने करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. ३१) सकाळी अकरा वाजता चिकलठाणा पोलिसांनी मांगवीरबाबा देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत गळ उपलब्ध करून देण्यास मंदिर व्यवस्थापनाला पोलिस प्रशासनाने मनाई केली. त्यास समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही सकारात्मकता दर्शविली.

अघोरी प्रथा बंद करून जादूटोणाविरोधी कायद्याची पायमल्ली थांबविण्याची मागणी लाल सेनेने पोलिसांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. `सकाळ`नेही याबाबत पाठपुरावा केला. त्यासंदर्भात चिकलठाणा पोलिस ठाण्यात देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक सत्यजीत यांनी बैठकीत गळ टोचण्याची प्रथा थांबविण्याच्या सूचना केल्या. देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर पाटील कचकुरे, सचिव सुरेश नाईकवाडे, सदस्य रमेश जाधव, वैजिनाथ मुळे व पोलिसपाटील अफसर पठाण यांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. 

पोलिसांना सहकार्य - मंदिर ट्रस्ट
गेल्या वर्षी बाराशे गळ टोचण्यात आले. भाविकांनी नवस बोललेला असतो. हनुमान जयंतीपासून ते उपवासाला सुरुवात करतात. १, ३, ५ वर्षांचा नवस असतो. त्यासाठी मंदिर प्रशासन शंभर रुपयांची पावती घेत गळ उपलब्ध करून देतात. त्या देणगी पावत्या या वर्षापासून बंद करण्यात येत असल्याचे मंदिर प्रशासनाचे सचिव सुरेश नाईकवाडे यांनी मान्य केले. मात्र, गळ न दिल्याने भाविकांत संताप निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिस प्रशासन म्हणेपर्यंत आम्ही गळ देणार नसल्याचेही ते म्हणाले.

जादूटोणाविरोधी कायद्याची पायमल्ली होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाला गळ देण्यास मनाई करण्यात आली असून, भाविकांचे मनपरिवर्तन, जनजागृतीसाठी उपाययोजना करीत आहोत.
- सत्यजीत ताईतवाले, सहायक पोलिस निरीक्षक

Web Title: aurngabad marathwada news mangvirbaba yatra