esakal | साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचा मान मिळणार लेखकाला
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्य संमेलन लोगो
  • उस्मानाबादेतील सोहळ्याचे राजकीय नेत्यांनाही निमंत्रण 

साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचा मान मिळणार लेखकाला

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री येणार की पंतप्रधान, सिने अभिनेता की क्रिकेटर अशा चर्चा दरवर्षी साहित्य वर्तुळात रंगतात. यंदा मात्र सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांऐवजी दिग्गज लेखकाच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांनी उद्‌घाटनाचा मान लेखकाला मिळाल्याचे चित्र उस्मानाबादला जानेवारीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर रसिक-वाचकांना पाहायला मिळणार आहे. 

मराठवाड्याच्या मातीत जवळपास पंधरा वर्षांनी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे ते दर्जेदार, संस्मरणीय राहील, अशा पद्धतीने सध्या तयारी केली जात आहे. संमेलनाला आता एक महिना बाकी आहे. त्यामुळे उस्मानाबादमधील आयोजक संस्था तयारीसाठी अहोरात्र झटत आहेत.

संमेलन साधेपणाने

दरवर्षी संमेलनाचा खर्च 7 ते 8 कोटींच्या घरात जातो. यंदा असा खर्च केला जाणार नाही. सरकारने दिलेल्या 50 लाखांत लोकवर्गणीतून जमा झालेल्या आणखी 50 लाखांची भर घालून संमेलन साधेपणाने साजरे केले जाणार आहे. असे अनेक चांगले पायंडे या संमेलनाच्या निमित्ताने घातले जात आहेत. त्यातच लेखकाच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन करण्याचा निर्णय साहित्य महामंडळ, आयोजक संस्थेने घेतला आहे.

हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या

देशमुखांच्या उडालेल्या कर्जबोजाची कोटीच्या कोटी उड्डाणे

 नयनतारा सहगल यांना झाला होता विरोध
गतवर्षी यवतमाळला झालेल्या 92व्या साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्याला ख्यातनाम लेखिका नयनतारा सहगल यांना बोलाविण्यात आले होते; पण राजकीय विरोधामुळे त्यांनी उद्‌घाटन सोहळ्याला यायला नकार दिला. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला वैशाली येडे यांचे नाव संमेलनाच्या पूर्वसंध्येला निवडण्यात आले. सहगल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होऊ शकले नाही; मात्र यंदा हा मान लेखकाला देण्याची तयारी महामंडळासह आयोजक संस्थेने केली आहे. यासाठी काही दिग्गज लेखकांची नावेही काढण्यात आली आहेत. यापैकी एकाला मान दिला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रणजित देसाई , वि.स. खांडेकर यांना मान
याआधी 50व्या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन रणजित देसाई यांनी, तर 51 व्या संमेलनाचे उद्‌घाटन वि. स. खांडेकर यांनी केले होते. त्यानंतर सातारा, परभणी, कऱ्हाड अशा काही संमेलनांचे उद्‌घाटन लेखकांच्या हस्ते झाले. काळाच्या ओघात ही परंपरा मागे पडली. यंदाच्या संमेलनापासून ती पुन्हा सुरू होत असल्याने साहित्य वर्तुळातून याचे कौतुक होत आहे. लेखकांबरोबरच विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनाही साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले जाणार आहे, असेही सांगण्यात आले. 


संमेलनाच्या तयारीबाबत उस्मानाबादला सोमवारी (ता. नऊ) घेतलेल्या बैठकीत संमेलनाचे उद्‌घाटक कोण, यावर चर्चा झाली. लवकरच नाव जाहीर केले जाईल. बैठकीत संमेलनाच्या एकूण तयारीचा आढावा घेण्यात आला. हे संमेलन संस्मरणीय होईल, असा विश्वास आहे. 
- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ 

loading image