मांजाचा दोर अन्‌ जिवाला घोर! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

काय करावे?
  पतंग उडविताना मोकळ्या जागेचा वापर करा, वर्दळीच्या ठिकाणी नकाे.
  नायलॉन मांजाचा वापर टाळा.
  विद्युतवाहिनी असणाऱ्या ठिकाणी काळजी घ्या.
  गच्चीवर चढून पतंग उडविताना सावध राहा.

औरंगाबाद - मकर संक्रांतीमुळे शहरी; तसेच ग्रमीण भागात पतंग उडविताना मजा येत असली, तरी नायलॉन मांजा पक्ष्यांना व रस्त्यावरील दुचाकीस्वरांना जीवघेणा ठरत आहे. शहरातील गल्लोगल्लीत नायलॉन मांजाची विक्री होत आहे. 

संक्रांतीनिमित्त लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच पतंग उडविण्याचा मोह होत असतो; परंतु उत्साहाच्या भरात पाहिजे ती सुरक्षेची काळजी न घेतल्याने अपघातांना  निमंत्रण मिळते. त्यात कटलेला पतंग बऱ्याचदा झाडावर किंवा विजेच्या तारांवर अडकून राहिल्याने पक्ष्यांना मोठी दुखापत होते; तसेच माणसांनाही दुखापत होते. मागील अनेक दिवसांमध्ये नायलॉन मांजा अडकल्यामुळे बऱ्याच नागरिकांना गंभीर दुखापत झाली आहे. अनेकांचे गळे, हातापायांना दुखापत झाली आहे. अनेक पक्षी देखील या मांजामुळे मृत्युमुखी पडले आहेत. नायलॉन मांजाचा धोका लक्षात घेता शासनाने याच्या विक्रीला बंदी घातली आहे; परंतु शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत असल्याने दुचाकीस्वारांबरोबरच पक्ष्यांवर मोठी संक्रांत आली आहे.

पालकांनी पाल्यांना नायलॉन मांजा न वापरण्याचे समजावून सांगितले पाहिजे. त्याचे दुष्परिणाम आपल्याबरोबरच निसर्गावर होत आहेत. नायलॉन मांजाचा वापर टाळला पाहिजे. नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर; विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.
- रमेश राऊत, पर्यावरण व पक्षीमित्र

काय करावे?
  पतंग उडविताना मोकळ्या जागेचा वापर करा, वर्दळीच्या ठिकाणी नकाे.
  नायलॉन मांजाचा वापर टाळा.
  विद्युतवाहिनी असणाऱ्या ठिकाणी काळजी घ्या.
  गच्चीवर चढून पतंग उडविताना सावध राहा.

Web Title: Avoid using nylon manja